वर्षभर गणेशभक्त ज्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) आतुरतेने वाट पाहत असतात तो गणेश चतुर्थीचा यंदाचा सण आता अवघ्या काही तासांवर आला आहे. यंदा 22 ऑगस्ट दिवशी जगभरात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) साजरी केली जाणार आहे. दरम्यान या सणाच्या निमित्ताने घराघरात लगबग सुरू आहे. पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा कारणारे सारेच गणेशभक्त यंदा बाप्पाला घरी विराजमान करण्यासाठी पुजेपासून नैवेद्याची तयारी करत आहेत. मग या सणाच्या निमित्ताने जर तुम्ही काही रीती-भाती पाळत असाल तर त्यामधील एक गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी चंद्र न बघणं. अनेक गणेशभक्त गणेश चतुर्थी दिवशी चंद्राकडे पाहणं टाळतात. अशी आख्यायिका आहे की, गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिल्यास त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येतो, वर्षभर संकटांचा सामना करावा लागतो. Ganesh Chaturthi 2020 Pran Pratishthapana Muhurat: गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून.
तुमचा देखील गणेश चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन न करण्याचा नियम असेल तर पाहा यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन टाळण्याची नेमकी वेळ कोणती? या प्रथेमागील पौराणिक कथा काय आहे?
गणेश चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन का टाळतात?
चंद्र हा शुभ्र-निरभ्र होता. त्याच्या सौंदर्याचा त्याला अभिमान होता. एकदा गणराज त्यांचं वाहन उंदरावरून जाता-जाता धडपडले. हत्तीचं मोठं डोकं, लंबोदर असलेल्या गणपतीला या गोष्टीचा राग आला. त्यावेळेस गणपतीने रागाने चंद्राला शाप दिला तुला तुझ्या सौंदर्याचा अभिमान आहे. मग गणेश चतुर्थीला तुझं तोंड कुणीच पाहणार नाही. जो पाहील त्यावर चोरीचा आळ आणि संकटं येतील. त्यानंतर चंद्र देव आकाशात झाकोळले गेले. देवांनी गणपतीला प्रसन्न करून चंद्राची शापातून मुक्तता करून घेतली.
पुराणातील या कथेवरूनच गणेशभक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्रदर्शन टाळतात. चुकून चंद्र दर्शन झाल्यास संकष्टीचं व्रत करून संकटं कमी करण्यासाठी प्रार्थना करतात.
गणेश चतुर्थी 2020 चंद्र दर्शन निषिद्ध वेळ
भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे 22 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत चंद्र दर्शन टाळावं.
गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे किमान दीड ते 10 दिवस घराघरामध्ये विराजमान होतात. त्याची आराधना करण्यासाठी बाप्पाच्या आवडीची फुलं, दुर्वा ते मोदकांच्या प्रसादाचा नैवैद्य केला जातो.
(टीप: सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे.)