भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमाला अभेद्य बनविणारे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (Dr. A. P. J. Abdul Kalam Birthday) म्हणून 15 ऑक्टोबर ही तारीख इतिहासात नोंदली गेली आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे मच्छीमार कुटुंबात झाला. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिनही साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर 2010 रोजी, संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून वैमानिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि 1958 मध्ये ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये सामील झाले. त्यांनी अनेक यशस्वी क्षेपणास्त्रांची निर्मिती करणारा कार्यक्रम आखला, ज्यामुळे त्यांना ‘मिसाईल मॅन’ हे टोपणनाव मिळाले. कलाम 1992 ते 1997 पर्यंत संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि नंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदासह सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार झाले.
देशाच्या 1998 च्या अण्वस्त्रांच्या चाचण्यांमध्ये त्यांच्या प्रमुख भूमिकेने भारताला अणुशक्ती म्हणून मजबूत केले. पुढे कलाम यांनी जुलै 2002 मध्ये भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पेपर विकणारा मुलगा ते भारताचे राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून भारताच्या भावी पिढीला अनेक प्रेरणादायी गोष्टी मिळू शकतात. तर डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे काही खास विचार-
दरम्यान, राष्ट्रपती पदानंतर नागरी जीवनात परतल्यावर, कलाम भारताला विकसित देशात बदलण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वचनबद्ध राहिले आणि त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. विज्ञानाचे परम भोक्ते असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील, मृदुभाषी व साधे होते. त्यांच्या कार्याला सलाम करत, भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व ‘भारतरत्न’ हे सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.