Diwali 2018 : भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला का ओवाळते ?
भाऊबीज (Photo Credit : Twitter)

सण हा भारतीय संस्कृतीचा एक अभिवाज्य भाग. विविध सणांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे. हे सण जितके आनंदी, उत्साही, प्रसन्न तितकेच अर्थपूर्ण. प्रत्येक सण जीवनात नवीन शिकवण आणतो आणि आपले विचार संपन्न करतो. काळानुसार सण साजरे करण्याच्या पद्धती थोडयाफार बदलल्या. तरी बऱ्याच ठिकाणी आपली मूळ परंपरा जपली जाते. दीर्घायुष्यासाठी धनतेरसच्या दिवशी यमदीपदान का केले जाते ?

रोषणाईचा आणि झगमगाटाचा सण दिवाळी काही दिवासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या जीवनात आनंद आणणाऱ्या दिवाळीचे नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीज हे चार दिवस महत्त्वाचे मानले जातात.

भाऊबीज हा सण बहिण भावाच्या निस्सीम, निरागस प्रेमाचा मंगलमय दिवस म्हणून साजरा केला जातो. भाऊबीजेला 'यमद्वितीया' असेही म्हणतात. या दिवशी यम आपली बहिण यमुना हिच्या घरी जेवावयास जातो. त्यामुळे नरकातील जीवांना त्या दिवसापूरते मोकळे केले जाते. म्हणून या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहिण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला दीर्घायुष्य, सौख्य, आनंद लाभावा म्हणून बहिण प्रार्थना करते.

सख्खा भाऊ नसल्यास मामे, चुलत, मावस, आत्ये भावाला ओवाळले जाते. इतकंच नाही तर मानलेल्या भावालाही ओवाळले जाते. अगदीच कोणी भाऊ नसल्यास चंद्रालाही ओवाळ्याची प्रथा आहे.

बहिणीने ओवाळल्यानंतर भाऊ यथाशक्ती आपल्या बहिणीला वस्त्र, दागिने किंवा द्रव्य (पैसे) देतो. या गिफ्टमागे प्रेम, आपुलकी असते.