
Datta Jayanti 2019: प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. यंदा 11 डिसेंबर ला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंती दिवशी दत्तात्रेयची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. दत्तात्रेयाला ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. तसेच दत्तात्रेयामध्ये 'गुरू' आणि 'देवता' या दोघांचाही मिलाफ आहे. त्यामुळे त्यांना 'गुरूदेव दत्त', असं म्हटलं जातं. राज्यात माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी दत्त जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. अनेक दत्तभक्त या दिवशी मोठ्या भक्तीभावाने दिवसभर उपवास करतात. परंतु, अनेकांना दत्त जयंती का साजरी केली जाते किंवा दत्त जयंती साजरी करण्यामागे नेमकी काय कथा आहे हे माहित नसते. तुम्हालाही दत्त जयंती साजरी करण्यामागची कथा जाणून घ्यायची असेल तर, हा लेख तुमच्यासाठी...
दत्त जयंती का साजरी केली जाते? (हेही वाचा - Datta Jayanti 2019: दत्त जयंती यंदा 11 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या दत्तात्रेय जयंतीचं महत्त्व, पूजा वेळ काय?)
पौराणिक कथेनुसार, अनसूया ही पवित्र प्रतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे व्रत नित्यनेमाने करून मोठी सिद्धी प्राप्त केली होती. इंद्र देवाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या कडे जाऊन अनसूयाचे सामर्थ आपणास ठाऊक नाही. ती कोणालाही दैवत्व बहाल करत शकते, असा दावा केला. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले. अनसूया आपल्या आश्रमात एकटीच होती. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे भिक्षुकाच्या रूपात तेथे आले. त्यांनी अनसूयेला भोजनदान करण्यास सांगितले. त्या काळात अनसूयाचा आश्रम हा इच्छित भोजन मिळवण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे अनेक वाटसरू किंवा यात्रेकरू, भिक्षुक जेवणासाठी या आश्रमात येत असत. अनसूया अगदी आनंदाने सर्वांना जेवायला घालत असे. दरम्यान, अनसूया ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना जेवण घेऊन येण्यासाठी आपल्या कुटीमध्ये गेली. ती जेवण घेऊन आल्यानंतर ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी अनसूयाला विवस्त्र होऊन जेवण वाढण्यास सांगितले. यावेळी अनसूया कुटीत गेली आणि तिने आपल्या पतीचे स्मरण केले.
हेही वाचा - Datta Jayanti 2018 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?
अनसूया यावेळी आपल्या पतीला मनोमन म्हणाली की, माझ्या घरी येणारा प्रत्येक अतिथी मला माझ्या बाळाप्रमाणे आहे. म्हणून मी या अथितींना विवस्त्र होऊन जेवण वाढत आहे. त्यानंतर अनसूयेने वस्त्र उतरवली. जेवण वाढायला जाणार तेवढ्यात त्या तिनही भिक्षुकांचे बाळामध्ये रूपांतर झाले होते. ही बाळं खूप रडत होती. त्यामुळे अनसूयेने त्यांना स्तनपान केले. तेव्हा ही तिनही बाळं रडण्याची थांबली.
त्यानंतर अनसूयाने त्या बाळांना औदूंबराच्या झाडाला झोका बांधला. यावेळी अनसूयेचे पती अत्रीऋषी त्या ठिकाणी आले. त्यावेळी त्याठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट झाले. त्यांनी अनसूयेला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा अनसूयेने पाळण्यातील बाळे आपल्याला ठेवण्यास सांगितले. यावर देवांनी दिली आशीर्वाद दिला. या तीन बळांपैकी विष्णू झालेले बाळ म्हणजे दत्त, शंकरापासून दुर्वास तर बह्मा पासून चंद्र अशी ती तीन बाळे होती. त्यातील दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. तर चंद्र आकाशात निघून गेले. तसेच दत्त पृथ्वीवर दैत्य संहार आणि भक्त रक्षणासाठी राहिले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते.