Dahi Handi 2019: जाणून घ्या का साजरा केला जातो 'दहीहंडी'चा उत्सव; या दिवसाचे महत्व आणि इतिहास
Dahi Handi (Photo Credits: Flickr, Wikipedia)

Significance And History Behind Dahi Handi: भारत, संस्कृती.. सण-उत्सव.. चालीरीती यांचा देश. श्रावण मुळीच अनेक उत्सवांचा नजराणा घेऊन येतो. पौर्णिमेनंतर श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणजे कृष्ण जन्म दिवस (Krishna Janmashtami) साजरा केला जाईल. मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यंदा 23 ऑगस्ट रोजी हा सण साजरा होईल. त्याच्याच दुसऱ्या दिवशी मोठ्या धूमधडाक्यात गोपाळकाला किंवा दहीहंडी (Dahi Handi) साजरी होईल. गोकुळाष्टमी साजरा करण्यामागचा उद्देश आपण समजू शकतो, मात्र दहीहंडी का साजरी केळी जाते याबद्दन अनेकांना माहिती नाही. चला तर पाहूया काय आहे या दिवसाचे महत्व

गोकुळाष्टमी उत्सवासाठी जो प्रसाद बनवला जातो त्यास गोपाळकाला असे म्हणतात. अनेक गोष्टी एकत्र करून हे मिश्रण तयार केले जाते. यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इ. गोष्टींचा समावेश होतो. हाच दहीकाला खाऊन गोकुळाष्टमीचा उपवास सोडण्याची प्रथा आहे. याच दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचीदेखील प्रथा आहे. कृष्णाला हा काला अतिशय प्रिय होता म्हणून प्रसाद म्हणून काल्याचे सेवन केले जाते. (हेही वाचा: Janmashtami 2019 Recipes: गोकुळाष्टमीचा खास प्रसाद गोपाळकाला आणि सुंठवडा घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video)

श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून, त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. तर दुसरीकडे श्रीकृष्णाला दही, लोणी, दुध-तूप यांची आवड होती. लहानपणी यशोदा या गोष्टी त्याच्यापासून लपवून उंच शिंक्यावर ठेवत असे. मात्र आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. अशाप्रकारे या दोन्ही गोष्टींचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो.

महाराष्ट्रात कोकणात आणि मुंबईमध्ये हा दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर उभे राहून उंचच्या उंच थर उभे केले जातात. शेवटी एकमेक्नाच्या आधाराने उंचावर टांगलेला मडके फोडले जाते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचा आवडता काला असतो. हाच काला प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.