Games (Photo Credits: File)

'बालपण' (Childhood)अशी गोष्ट जी प्रत्येकाला नेहमी हवीहवीशी वाटते. आयुष्याच्या जडणघडणीत पहिला पण अतिशय महत्वाचा असा टप्पा जो तुमच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवतो. जेव्हा बालपण सरतं आणि मोठेपणं म्हणजेच शहाणपणं येतं तेव्हा माणूस बदलायला लागतो. सद्य परिस्थितीचे भान येते. बालपण म्हणजे निरागस, निर्मळ आयुष्य ज्यात कसल्याही कटकटी, भांडणं नसतं जिथे आपण स्वत: साठी जगतो. त्यामुळे जर तुम्ही तुमचे बालपण जगले नसाल तर तुम्ही आयुष्यात खूप मोठ्या गोष्टीला मुकलात असं म्हणायला हरकत नाही. बालपण म्हटलं की बालपणीचे खेळ हे आलेच. असे खेळ जे मित्रांना एकमेकांजवळ आणायचे, ज्याने शरीराचा व्यायाम व्हायचा, भांडणं व्हायची, एकमेकांशी संवाद व्हायचा. पण आजच्या पिढीला हे खेळाची माहितीच नाहीए. कारण लगोरी, विटीदांडू, आंधळी-कोशिंबीर यांसारख्या अनेक खेळांची जागा मोबाईल, टॅब, टीव्ही, संगणक यांसारख्या यंत्रांनी घेतली. जेव्हा हे यंत्र आजच्या पिढीच्या हाती आले तेव्हा आपोआप आपल्या आजूबाजूच्या जगाचा विसर पडला.

अनेक मैदानी खेळ माहित नसलेल्या या आजच्या पिढीला जुन्या पिढीतील रोमांचक अशा खेळांची बालदिनाचे औचित्य साधून उजळणी करुन द्यायची असेल तर तुम्हालाच एक पाऊल पुढे टाकावे लागेल आणि तुमच्या या कामात लेटेस्टली मराठी चा हा खास लेख. बघा तुम्हाला आठवतात का हे खेळ?

1. आईचा रुमाल हरवला:

या खेळात सर्व लहान मुले गोल करुन बसायचे आणि आणि ज्याच्यावर राज्य असायचे तो हातात रुमाल घेऊन त्यांच्याभोवती फिरत 'आईचा रुमाल हरवला' असं म्हणायचा मग त्यावर बाकीचे 'तो मला सापडला' असे म्हणायचे. त्यानंतर तो व्यक्ती कोणाच्या तरी पाठीमागे रुमाल ठेवून त्याला धप्पा देऊन पळायचा मग तो व्यक्ती तो रुमाल घेऊन तुमच्या मागे पळणार. त्यात जर तुम्ही पळून त्याच्या जागी बसण्यास यशस्वी झालात तर तो आऊट आणि त्याच्यावर राज्य.

2. संत्रा लिंबू:

संत्रा लिंबूमध्ये दोघे एकमेकांचे हात वर पकडून त्यांच्या हाताखालून बाकीचे सर्व जायचे. ते फिरत असताना एक गाण म्हटलं जायचं

संत्रा लिंबू पैशापैशांना

शाळेच्या मुली आल्या खेळायला

खेळून खेळून खोकला आला

डॉक्टर आले तपासून गेले

खो खो खो!

आणि मग जो त्यांच्या कत्रीत येईल तो आऊट

हेदेखील वाचा- Children's Day 2019: जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी का साजरा केला जातो बालदिन ? जाणून घ्या या मागील इतिहास

3. डोंगराला आग लागली पळापळा:

यात ज्याच्यावर राज्य तो डोळे मिटून डोंगराला आग लागली पळापळा असं म्हणायचा आणि बाकीचे सर्व गोल फिरायचे आणि तो जसा स्टॅच्यु म्हणेल तसे सर्वांनी आहे त्या जागेवर आहे उभे राहणे मग तो व्यक्ती तुम्हाला हसवायला येतो तुम्ही हसलात किंवा हललात की आऊट.

4. पकडापकडी:

हा फक्त एकमेकांना पकडण्याचा खेळ असायचा ज्यात खूप शारीरिक श्रम घ्यावे लागायचे.

5. डोंगर का पाणी:

यात जी उंच जागा असेल ते डोंगर आणि जी सखल जागा असेल ते पाणी. ज्याच्यावर राज्य असेल तो जे बोलेल ते सर्वांना मोजक्या जागेत नाही केले आणि शेवटी जो उरेल तो बाद.

6. पची:

हा खेळ मुलींचा खेळ असायचा ज्यात 5 दगडांच्या साहाय्याने खेळाचे वेगवेगळे प्रकार केले जायचे.

7. चपरी:

लादीच्या एका चपट तुकड्याच्या साहाय्याने हा खेळ खेळला जायचा. हा खेळ सुद्धा जास्त करुन मुली खेळायच्या.

8. आऊ-मीना:

हा बैठा खेळ असला तरी खूप मजेशीर खेळ आहे. ज्यासाठी असे गाणे म्हटले जाते.

आऊ-मीना

सुपरसीना

बिग बॉय लेझी गर्ल

स्टॅच्यु!!!

9. गाव-गाव:

हा खेळ देखील खूप मजेशीर आणि बुद्धिमत्तेचा खेळ होता. गावांची नावं माहित व्हायची, ज्याला येत नसेल तो बाद

10. सोनसाखळी:

यात पळत पळत एकमेकांना बाद करत साखळी बनवून सर्वांना बाद करणे.

हा लेख लिहिण्यामागे उद्देश्य एकच जी मजा हे खेळ खेळण्यात येत होती त्याची सर मोबाईल, टॅबला येणार नाही. या यंत्रांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात मात्र वर सांगितलेले मैदानी खेळ या शरीराचा व्यायाम तर होतोच शिवाय आनंद मिळतो तो वेगळाच. या खेळांची नक्की तुमच्या मुलांना आठवण करुन द्या. आणि आम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.