Chardham Yatra 2019: उत्तराखंडमध्ये तब्बल 6 महिन्यानंतर भक्तांसाठी उघडण्यात आले केदारनाथ मंदिराचे दरवाजे
Kedarnath temple Photo Credit: ANI

चारधाम यात्रा 2019(Chardham Yarta 2019): 6 महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी हे दरवाजे खुले करण्यात आले पासून आपल्या लाडक्या आराध्य देवताचे म्हणजेच भगवान शंकराचे दर्शन (Lord Shiva) घेण्यासाठी तसेच त्याचे मनमोहक रुप पाहण्यासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग(Rudra Prayag) जिल्ह्यामध्ये मोठमोठाल्या पर्वतांनी घेरलेले केदारनाथ मंदिर हे शिवभक्तांचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. भगवान शंकराचे हे मंदिर 85 फूट उंच 187 फूट लांब आणि 80 फूट रुंद असे आहे. आज पहाटे जेव्हा या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा शिवभक्तांनी हर-हर महादेवचा एकच जयघोष केला.

आपल्या आराध्याचे दर्शन घेण्यासाठी आतुर झाले भक्त:

मंदिराचे दरवाजे उघडण्याआधी बुधवारी म्हणजेच 8 मे ला गौरीकुंडातील गौरी माई मंदिरात पुजारींनी आराध्य देवतेचे पूजा-अर्चा करुन त्याला सजवून, नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर सकाळी 8 वाजता बाबा केदारनाथच्या पालखीने केदारनाथ मंदिराकडे प्रस्थान केले. जेथे पोहोचल्यावर मंदिर समितीच्या अधिका-यांनी आणि भक्तांनी पालखीचे मोठ्या दिमाखात स्वागत केले.

केदारनाथ मंदिराच्या संबंधित काही धार्मिक पुराणकथा:

केदारनाथ धाम भगवान शंकराच्या 12 ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. महाभारतातील युद्धात विजयी झालेल्या पांडवांनी आपल्या भावंडांची म्हणजेच कौरवांची हत्या केल्याच्या पापातून मुक्ती मिळावी, म्हणून भगवान शंकराचे आशीर्वाद घेऊ इच्छित होते. मात्र भगवान शंकर त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यामुळे त्यांना पांडवांना आशीर्वादही द्यायचे नव्हते. त्यासाठी ते केदार मध्ये ध्यानासाठी गेले. मात्र पांडवही त्यांच्या मागे मागे तिथे जाऊन पोहोचले.

Mahashivratri 2019: भारतात 'या' ठिकाणांवर आहेत भगवान शंकर यांच्या सर्वात मोठ्या प्रतिमा

पांडवांना टाळण्यासाठी भगवा शंकरांनी बैलाचे रुप धारण केले आणि अन्य प्राण्यांमध्ये जाऊन पोहोचले. मात्र याची शंका पांडवांना आली तेव्हा भीमाने विशाल रुप धारण करुन 2 पर्वतांवर आपले पाय पसरवले असता, सर्व गाय-बैल त्याच्या पायाखालून गेले. मात्र बैलाचे रुप धारण केलेले भगवान शंकर त्याच्या पायाखालून गेले नाही. तेव्हा भीम त्या बैलाला पकडले. मात्र बैल जमिनीत जाऊ लागले. त्यावेळी भीम ने त्याची पाठ पकडली. अखेरीस पांडवांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पांडवांनी आपल्या ख-या रुपात दर्शन दिले. तेव्हापासून भगवान शंकर बैलाच्या पाठीच्या आकारात पिंड स्वरुपाता केदारनाथमध्ये विराजमान झाले. आणि आज त्यांच्या ह्याच रुपाची पूजा केली जाते.