Bhayander Godevcha Raja | File Image

देशभर 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सावाला सुरूवात झाली आहे. यंदा 28 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा भक्तांच्या सेवेमध्ये आहेत. बाप्पांसाठी गणेशभक्तांनी कल्पकता वापरत देखावे, आरास सजवली आहेत. मुंबईच्या भाईंदर (पूर्व) येथील गोडदेवचा राजासाठी देखील यंदा खास आरास आहे. गोडदेवच्या राजाच्या दरबारात अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. गोडदेवच्या राजाच्या गणपतीची मूर्ती 18 फूट उंचीची आहे. तर पंडालच्या प्रवेशद्वारावर चांद्रयान-3 ची भव्य प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत आहे.

श्री साईनाथ मित्र मंडळाच्या बॅनरखाली, 1996 पासून हा गणपती उत्सव सुरू झाला. बाप्पाची गणेशोत्सवात 11 दिवस आराधना केली जाते. गणेश उत्सवात गणरायाची पूजा करणारे दिवंगत समाजसेवक राकेश म्हात्रे यांनी याची स्थापना केली होती. उत्सव साजरा करणे हा त्यांचा उद्देश होता. बाळ गंगाधर टिळकांनी महाराष्ट्रात बंधुभाव आणि एकात्मतेसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव असाच जिवंत आणि वाढत राहो. या इच्छेमधून हा गणेशोत्सव आजही साजरा केला जातो.

देशातील शास्त्रज्ञांना समर्पित हा महोत्सव

भारताच्या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ दररोज एक चित्रपट दाखवला जात आहे. यामध्ये चांद्रयान-3 चे प्रक्षेपण, त्याचे चंद्रावर आगमन आणि विक्रम लँडरची प्रत्येक क्रिया दर्शविली आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश सिंह सांगतात की, यंदाचा गणेशोत्सव आम्ही देशातील शास्त्रज्ञांना समर्पित केला आहे. संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने आम्ही आमच्या पद्धतीने केला आहे.

गणेशोत्सवाव्यतिरिक्त श्री साईनाथ मित्र मंडळ सामाजिक कार्यातही आपला वाटा उचलते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ची पर्वा न करता लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडून गरजूंना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप केले होते. मंडळाचे सचिव आशिष सावंत सांगतात की मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी किऑस्क उघडण्याची त्यांची योजना आहे.