भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्थीला म्हणजे उद्या 17 सप्टेंबर रोजी 2019 या वर्षातील पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi) असणार आहे. वास्तविक दरवर्षी सहा महिन्याच्या अंतराने अशा दोन अंगारकी चतुर्थी येतात, मात्र यंदा हिंदू कालदर्शिकेप्रमाणे ही एकमेव अंगारकी चतुर्थी असेल. तसेच यंदा गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2019) सोहळ्यानंतर लगेचच हा योग आल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. असं म्हणतात, अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. दिवसभराचा उपवास करून गणपतीची आराधना करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. चला तर मग, यंदाच्या अंगारकी निमित्त या दिवसाचे महत्व, पूजाविधी आणि तिथी जाणून घेऊयात..
अंगारकी चतुर्थी 2019 तारीख : मंगळवार, 17 सप्टेंबर 2019
चतुर्थी तिथी प्रारंभ: 17 सप्टेंबर 2019 , संध्याकाळी 4 वाजून 33 मिनिटे
चतुर्थी तिथी समाप्ती: 18सप्टेंबर 2019 , संध्याकाळी 6 वाजून 12 मिनिटे
चंद्रोदय: 17 सप्टेंबर, रात्री 8 वाजून 48 मिनिटे
अंगारकी चतुर्थी महत्व
हिंदू पुरणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाराज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तापसिने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले व सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्ह्णून संबोधले जाईल.
अंगारकी पूजा विधी
यादिवशी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ उरकून स्वच्छ नवे कपडे परिधान करावे. श्रीगणेशाची प्रतिमा घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापन करून पूजेचा संकल्प घ्यावा. अनुक्रमे या प्रतिमेला पाणी, अक्षदा, दुर्वा,पान, धूप इत्यादी अर्पण करावे. नैवैद्याला मोदक किंवा अन्य गोडाचे पदार्थ ठेवावे. पूजेच्या वेळेस म्हणजे चंद्रोदयानंतर गणपतीची आरती करून भोजन करावे. शक्यतो या जेवणात लसूण व कांद्याचा समावेश करणे टाळावे.
आजपासूनच या सोहळ्यासाठी मुंबईतील अनेक गणेश मंदिरांमध्ये लगबग पाहायला मिळतेय, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी तर पश्चिम रेल्वेने खास लोकलची सोय केली आहे.