जगभरात भारतीय सणांविषयी (Festivals Of India) कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. पण आपल्याला आपल्या सणांचा इतिहास ठाऊक आहे का? येत्या 7 मे ला हिंदू आणि जैन धर्मीयांचा महत्वाचा सण म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) देशभरात साजरा होणार आहे. हिंदू बांधवांच्या दृष्टीने या दिवसाला इतके शुभ व पवित्र मानले जाते की यादिवशी केलेल्या सर्व कामांमध्ये यश प्राप्त होणारच असा विश्वास पाहायला मिळतो. अक्षय तृतीयेची अजून एक ओळख म्हणजे या दिवशी सोन्याची खरेदी (Buying Gold) केल्यास घरात व आयुष्यात सुख, समाधान व धन टिकून राहते असे मानले जाते. Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं
पण या व्यतिरिक्त अक्षय्य तृतीया या सणाचे महत्त्व व या दिवसाविषयीच्या 5 अनोख्या गोष्टी जाणून घ्या..
1) हिंदू धर्माची सुरवात
अनेक पौराणिक कथांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्माची सुरवात झाली असे दाखले देण्यात आले आहेत. याच दिवशी बुद्धीची देवता गणपतीने सर्व अडथळ्यांना दूर करून महर्षी व्यास यांच्या सांगण्यानुसार महाभारत लिहिण्यास सुरवात केली. हिंदू कथांनुसार याच दिवशी श्री कृष्णाने द्रौपदीला एक पान देऊ केले, ज्यात पांडवांसाठी पुरेसे अन्न प्रकट झाले होते. अक्षय्य तृतीयेच्या तिथीला पहिलं युग-सत्ययुगाची सुरवात झाली होती. या युगाला सुवर्ण युग म्हणून देखील संबोधले जाते.
2) देवतांचा जन्मदिवस
अक्षय्य तृतीया या दिवसाला भारतात काही भागांमध्ये अक्ख तीज म्हणून देखील ओळखले जाते. यादिवशी प्रभू परशुरामाचा जन्म झाला असे मानण्यात येते. याच दिवशी पवित्र गंगा पृथ्वीतलावर प्रकट झाली तसेच अन्नपूर्णा या देवतेचा देखील जन्म झाल्याचे सांगितले जाते.
3) जैन धर्मात आहे महत्वाचं स्थान
जैन धर्माचे पहिले तीर्थांकर प्रभू आदिनाथ म्हणजेच रिषभदेव यांच्याशी या दिवसाचा संबंध जोडला जातो. शेकडो वर्षांपूर्वी रिषभदेवाने जवळपास वर्षभर चालू ठेवलेला उपवास उसाचा रस पाषाण करून सोडला होता, त्यानंतर जैन धर्मीय 'वर्सीतप' या पर्वात एक दिवस आड उपवास करतात व अक्षय्य तृतीयेला हा उपवास सोडताना उसाचा रस प्यायची प्रथा आहे.
4) शेतीचा संकेत देणारा दिवस
भारतात अन्य भागांसोबतच उत्तरेकडे देखील मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. पंजाब मधील 'जाट' शेतकरी यादिवशी पहाटे लवकर उठून शेताच्या दिशेने चालू लागतात. या वाटेत त्यांना जो कोणी प्राणी किंवा पक्षी पहिले सापडेल त्याची शिकार करून येत्या वर्षात शेतीत कसे पीक येईल तसेच पाऊस किती पडेल याविषयी अंदाज वर्तवले जातात.
5)ग्रहांची रचना शुभ कामाला साजेशी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य हा सर्वात अधिक प्रखर असतो असे मानले जाते. चंद्रासहित अन्य ग्रहांची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याचे तेज यादिवशी वाढताना पाहायला मिळते. हा संकेत लग्न व अन्य शुभ कामांसाठी पवित्र मानला जातो. या दिवशी केलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होणारच असा विश्वास देखील अनेक जण दर्शवतात.
टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.