Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं
प्रतिकात्मक फोटो | (Photo credit: archived, edited, representative image)

Akshaya Tritiya: वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) हा सण हिंदू धर्मियांसाठी (Hindu Festival) अतिशय महत्वाचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार अतिशय शुभ आणि पवित्र आहे असे देखील सांगितले जाते, या दिवसाचे पावित्र्य हिंदूंच्या मते इतके जास्त आहे की या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. अक्षय तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला (Gold Buying) पसंती दर्शवतात.

यंदा अक्षय तृतीया 7 मे ला साजरी केली जाणार असून त्यासाठी सोन्याच्या बाजारात आता पासूनच तयारी सुरु झाली आहे, सोन्याची वाढती मागणी पाहता सोन व्यापारी वेगवेगळ्या ऑफर्सने ग्राहकांना खेचून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण या दिवशी सोन खरेदीला इतकं महत्त्व का दिलं जातं हे तुम्हाला माहित आहे का? Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

 

जाणून घ्या या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचे 5 फायदे

1) धन आणि समृद्धीचं प्रतिक

सोने प्राचीन काळापासूनच सर्वांच्या आवडीचा व किंमती धातू म्हणून ओळखला जातो. पुराणात सोन्या मुळे आयुष्यात समृद्धी येते असा विश्वास देखील दर्शवला आहे.या धातूला आजही बाजारात इतकी मागणी आहे की सोन्याचे भाव नेहमीच वधारलेले असतात.

2) सोने हे शक्तीचे प्रतिक

सोन्याचा संबंध नेहमी सूर्याशी लावला जातो. सूर्याचे तेज हे अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वाधिक असल्याचे देखील पाहता येते, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्यास सूर्यदेवतेचा आशीर्वाद राहतो आणि शक्ती व तेजाचे आपल्या जीवनात अस्तित्व टिकून राहते असे मानले जाते.

3)चिरंतर समृद्धी प्राप्त होते

अक्षय म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही, अशा दिवशी सोन्याची खरेदी केल्यास संपत्तीत कधीही घट होत नाही शिवाय आपल्या जवळील धन व समृद्धी कायम टिकून राहते असे म्हणतात. अक्षय तृतीयेला केलेल्या कामात चिरंतर टिकणारे यश व समृद्धी मिळते असा या मागील विश्वास आहे.

4)देवतांची कृपा टिकून राहते

साधारणतः हिंदू पुराणांचा अभ्यास केल्यास सोन्याची देवता म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास त्याबरोबर लक्ष्मी व विष्णू या देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो, अशी समजूत आहे. या देवतांच्या आपल्या आयुष्यातील वास्तव्याने धन आणि समृद्धीत वेळेसोबत वाढ होत राहते असेही मानले जाते.

5) ऑफर्सची चंगळ

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं बाजारात मोठया उलाढाली होताना पाहायला मिळतात.अशा वेळी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यापारी वेगवेगळी सूट देऊन किंवा 'या खरेदी वर हे मोफत' अशा ऑफर्स देत असतात. या ऑफर्सचा फाययद घेऊन स्मार्ट ग्राहक कमी दारात सोने खरेदी करू शकतात.

या व्यतिरिक्त अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात येणाऱ्या स्नान, जप,यज्ञ आणि तपाला देखील विशेष महत्त्व आहे, यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते तसेच यादिवशी शास्त्रोक्त पूजा केल्यास लक्ष्मीची कृपादृष्टी बनून राहते असे मानण्यात येते.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.