अक्षय तृतीया 2019 (Photo Credits: Facebook)

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे स्वतःचे असे महत्व आहे. या सणाच्या तिथी, मुहूर्त यांचा या मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने योग्य उपयोग केला, तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ‘अक्षय तृतीया’ (Akshaya Tritiya) ही अशीच एक तिथी, वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे फार महत्व आहे. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते, त्यामुळेही हा दिवस फार महत्वाचा आहे. यावर्षी 7 मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय' (न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

हा दिवस साजरा करण्याची पद्धत - पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात.

यादिवशी अशा शुभ गोष्टी करू शकता – नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, मातीत आळी घालून पेरणी करणे, शेतजमिनीची मशागत, नवीन वाहन खरेदी

मुहूर्त –

मंगळवार, 7 मे 2019 - अक्षय तृतीया

अक्षय तृतीया पूजा मुहूर्त – सकाळी 05:40 ते दुपारी 12:17 पर्यंत

सोने खरेदी करण्याचा मुहूर्त- सकाळी 6.26 ते रात्री 11.47 पर्यंत

अक्षय तृतीयेचे महत्व –

> या दिवशी बद्रीनारायणाच्या देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.

> जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.

> वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. या दिवशे मातीचे माठ किंवा रांजण, आंबे, मिठाई किंवा गोड पदार्थ, वस्त्रे किंवा कापड दान करावे.