
अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar), ज्यांना 'पुण्यश्लोक राजमाता' म्हणून ओळखले जाते, यांची 31 मे रोजी 300 वी जयंती (Ahilyabai Holkar Birth Anniversary) साजरी होत आहे. मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या या तेजस्वी राणीने आपल्या कुशल प्रशासन, धार्मिक कार्य आणि सामाजिक सुधारणांद्वारे इतिहासात नाव कोरले. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चोंडी गावाचे पाटील होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे दुर्मीळ होते, परंतु माणकोजींनी आपल्या मुलीला वाचन आणि लेखन शिकवले. वयाच्या आठव्या वर्षी, मराठा पेशव्यांचे सेनापती मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंची धार्मिकता आणि बुद्धिमत्ता पाहून त्यांना आपल्या मुलासाठी, खंडेराव होळकरांसाठी, वधू म्हणून निवडले. 1733 मध्ये त्यांचा विवाह झाला, आणि त्यांनी होळकर घराण्यात प्रवेश केला.
अहिल्याबाईंना जीवनात अनेक वैयक्तिक शोकांतिका सहन कराव्या लागल्या. 1754 मध्ये त्यांचे पती खंडेराव कुम्हेरच्या लढाईत मृत्यूमुखी पडले, तेव्हा त्या अवघ्या 29 वर्षांच्या होत्या. त्यांना सती जाण्यापासून सासरे मल्हाररावांनी रोखले आणि त्यांना राज्यकारभारात प्रशिक्षण दिले. 1766 मध्ये मल्हाररावांचे निधन झाले, आणि त्यानंतर त्यांचा मुलगा मालेराव याचाही मानसिक आजाराने मृत्यू झाला. या सर्व दुखद घटनांनंतर, अहिल्याबाईंनी 1767 मध्ये माळवा प्रांताची सूत्रे हाती घेतली. पेशव्यांनी त्यांना इंदूरची राणी म्हणून मान्यता दिली, आणि त्यांनी 28 वर्षे (1767-1795) राज्य केले.
अहिल्याबाईंनी माळवा प्रांताला समृद्धी आणि स्थिरतेच्या शिखरावर नेले. त्यांनी माहेश्वरला आपली राजधानी बनवली आणि तिथे साहित्य, संगीत, कला आणि उद्योगांचा विकास केला. त्यांनी तुकोजीराव होळकरांना लष्करप्रमुख नियुक्त करून माळव्यास आक्रमणांपासून संरक्षित केले. स्वतः युद्धभूमीवर उतरून त्यांनी शत्रूंविरुद्ध लढा दिला. त्यांनी मराठा संघराज्याविरुद्ध माळव्याची स्वायत्तता राखली आणि कुशल राजनैतिक रणनीतींद्वारे प्रांताला मजबूत केले.
त्यांचा न्यायप्रिय प्रशासन हा त्यांच्या शासनाचा कणा होता. त्या दररोज जनतेच्या समस्या ऐकत आणि त्वरित निर्णय घेत. अहिल्याबाईंनी आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून भारतभर मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि विश्रामगृह बांधले. त्यांनी 1780 मध्ये औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्बांधण केले. सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, गया, पुष्कर, वृंदावन, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांवर त्यांनी मंदिरे आणि सुविधा उभारल्या. त्यांनी सप्तपुरी आणि चारधाम येथे धार्मिक कार्यांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले.
अहिल्याबाईंनी सामाजिक सुधारणांना प्राधान्य दिले. त्यांनी विधवांना मालमत्तेचा हक्क मिळवून दिला आणि सतीप्रथेला विरोध केला. त्यांनी इंदूरला एक आधुनिक शहर बनवले, वनसंरक्षण केले आणि व्यापाराला चालना दिली. त्यांनी भिल्ल आणि गोंड जमातींना शेतीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे मुख्य प्रवाहात समावेश केले. त्यांच्या शासनाला 'रामराज्य' चे प्रतीक मानले जाते, जिथे समृद्धी, विश्वास आणि सामाजिक समता होती.
नागपूरमध्ये 25 मे, 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथे 27 आणि 28 मे, 2025 रोजी ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ या नावाने दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आणि नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तसेच 28 मे, 2025 रोजी ‘राजयोगिनी अहिल्यादेवी’ या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
पुणे येथील कार्यक्रम 31 मे, 2025 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. येथे शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळ, भारूड, वासुदेव आणि पुण्यश्र्लोक महानाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा रसिकांच्या मनात ठसा उमटवणार आहे. यासह मध्य प्रदेश सरकारने इंदूरमध्ये 30 आणि 31 मे रोजी द्विदिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे.