
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवाती पासून ते पुढील महिनाभर सर्वत्र एक पोस्ट व्हायरल होताना दिसणार आहे, ती म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ (No Shave November). मागील काही वर्षात परदेशात चालू असणारा हा ट्रेंड अलीकडे भारतातही आवर्जून पाळला जातो. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून त्यामागे एक सामाजिक उपक्रम आहे. संपूर्ण महिनाभर पुरुष मंडळींनी दाढी न करता त्यासाठी लागणारे पैसे कर्करोगग्रस्त (Cancer Patient) रुग्णांना देण्याची संकल्पना या ट्रेंडमध्ये आहे.या सोबतच पुरुषांचे आरोग्य जपण्याच्या हेतूने सुद्धा ही मोहीम जागृकता निर्माण करण्याचे काम करते.
सामान्यपणे आपल्याकडे सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तो ट्रेंड फॉलो करण्याची पद्धत आहे. यामुळे बहुधा त्या ट्रेंडची पूर्तता होते पण त्यामागील मूळ उद्देश काय आहे हे समजून घेतल्यास या आपण फॉलो केलेल्या ट्रेंडचा उपयोग आणि त्यामुळे मिळणारे समाधान ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य होतात. चला तर मग आजपासून सुरु होणाऱ्या या नो शेव्ह नोव्हेंबर चा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात
काय आहे नो शेव्ह नोव्हेंबर?
1999 साली मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळू लागतात. तर चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सर संदर्भातील मोहिमेला दान करायचे. हे पैसे कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजाराच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांना दान केले जातात.
या संस्थेला 2004 पासून मोव्हेंबर हे नाव देण्यात आले. यातलं मो म्हणजे मुस्टॅचेस म्हणजेच मिशा आणि व्हेंबर हे नोव्हेंबर महिना दर्शवणारे शब्द एकत्र करून हा शब्द शोधण्यात आला. कालांतराने या मोहिमेतून कॅन्सर रुग्णांच्या सोबतच पुरुषांच्या वाढत्या आत्महत्येसाठी सुद्धा काम करण्यास सुरुवात केली आहे.
अधिक माहितीसाठी no-shave.org या संकेत स्थळावर तुम्ही नक्की भेट द्या.
दरम्यान, या महिन्यात आपण हा ट्रेंड फॉलो करत असताना छान दाढीवाला लूक बनवून स्टाईल करू शकता. तुम्हीही हा ट्रेंड फॉलो करणार असाल तर #NoShaveNovember या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर आमच्यासोबत फोटो शेअर करायला विसरू नका..