
जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट, मेट गाला 2025 (Met Gala 2025), 5 मे 2025 रोजी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित होत आहे. यंदा हा सोहळा भारतासाठी विशेष आहे, कारण बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ प्रथमच या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवणार आहेत. याशिवाय, अभिनेत्री कियारा अडवाणी देखील तिच्या पहिल्या मेट गाला पदार्पणाने सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे, तर प्रियंका चोप्रा पाचव्या वेळी या सोहळ्यात सहभागी होणार आहे.
‘सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल’ या थीमसह आणि सूट आणि पुरूषांच्या कपड्यांच्या संग्रहाचा संदर्भ देणाऱ्या ‘टेलर्ड टू यू’ या ड्रेस कोडसह, हा इव्हेंट काळ्या फॅशनच्या 300 वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करेल. दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमात पुरुषांच्या कपड्यांसाठी खास अशी शैली सादर केली जात आहे. मेट गाला हा मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणारा एक भव्य सोहळा आहे, जो दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो.
यंदा हा कार्यक्रम 5 मे 2025 रोजी न्यूयॉर्कमध्ये संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल, जो भारतात 6 मे 2025 रोजी पहाटे 3:30 वाजता (आयएसटी) असेल. या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण व्होग मॅगझिनच्या अधिकृत यूट्यूब चॅनल, व्होगच्या वेबसाइट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. लाइव्हस्ट्रीमचे यजमान गायिका टेयाना टेलर, अभिनेत्री ला ला अँथनी आणि विनोदवीर इगो न्वोदिम असतील, जे या सोहळ्याला आणखी रंगत आणतील. मेट गालामध्ये मोबाइल फोन आणि सोशल मीडियावर बंदी असते, त्यामुळे सेलिब्रिटींचे थेट अपडेट्स फक्त अधिकृत प्रसारणातूनच मिळतील. (हेही वाचा: Prada to Acquire Versace: इटालियन फॅशन क्षेत्रातील ऐतिहासिक करार; प्राडा विकत घेणार आर्थिक अडचणींचा सामना करणारा प्रतिस्पर्धी 'वर्साचे' ग्रुप)
या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मेट गाला 2025 चे थेट प्रक्षेपण-
शाहरुख खान यंदा प्रथमच मेट गालावर पाऊल ठेवणार आहे. तो प्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जीचा रॉयल आणि मॅक्सिमलिस्ट डिझाइन परिधान करणार असल्याची माहिती आहे. सब्यसाचीच्या 25व्या वर्धापनदिनाच्या ज्वेलरी कलेक्शनमधून प्रेरणा घेतलेला हा लूक शाहरुखच्या शाही व्यक्तिमत्त्वाला साजेसा असेल. दिलजीत दोसांझ, ज्याने कोचेला आणि पॅरिस फॅशन वीकमधील आपल्या परफॉर्मन्सने जागतिक स्तरावर नाव कमावले आहे, तोही या मेट गालावर आपली अनोखी शैली दाखवणार आहे.
दिलजीतने इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर करत आपल्या पदार्पणाची घोषणा केली. दिलजीत गुगल पिक्सेलचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दिलजीतचा हा लूक त्याच्या पंजाबी स्वॅग आणि जागतिक फॅशनच्या मिश्रणाने सर्वांचे लक्ष वेधणारा ठरेल. हा मेट गाला 2025 भारतीय फॅशन आणि सिनेमासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.