Photo- Instagram/@ankushbahuguna

गेल्या अनेक महिन्यापासून वरचेवर सायबर फसवणुकीच्या (Cyber F​raud) घटना समोर येत आहेत. सरकार याबाबत जनजागृती करत आहे, मात्र तरीही लोक अशा घोटाळ्याचे शिकार होत आहेत. अलीकडे एक प्रसिद्ध युट्युबर डिजिटल अटक घोटाळ्याचा बळी ठरला. युट्युबरने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचा खुलासा केला आहे. अंकुश बहुगुणा (YouTuber Ankush Bahuguna) असे या यूट्यूबरचे नाव असून त्याने रविवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याला सुमारे 40 डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. अंकुशच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्यामुळे त्याचे पैसे तर गेलेच मात्र, मानसिक आरोग्याचे नुकसान झाले. आता डिजिटल अटक घोटाळ्याचा बळी ठरलेला अंकुश लोकांना जागरुक करत आहे, जेणेकरून त्याच्यासारखा दुसरा कोणी या घोटाळ्याला बळी पडू नये.

अशी झाली फसवणुकीला सुरुवात-

अंकुशने सांगितले, जिममधून परतल्यानंतर, त्याला एका विचित्र नंबरवरून कॉल आला, ज्याची सुरुवात +1 ने होत होती. त्याला वाटले की हा एक स्वयंचलित कॉल असेल, पण त्याने उचलताच त्याला सांगण्यात आले, 'तुमची कुरिअर डिलिव्हरी रद्द झाली आहे, मदतीसाठी शून्य दाबा.' यावर त्याने शून्य दाबले आणि तिथून ही घटना सुरू झाली. (हेही वाचा: Delhi Fake Model Dating App Scam: अमेरिकन मॉडेल असल्याचे भासवून 700 महिलांची फसवणूक; खाजगी फोटो-व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल)

डिजिटल अरेस्ट-

कॉलवर समोरच्या व्यक्तीने त्याला सांगितले की, त्याच्या पॅकेजमध्ये अवैध माल आढळून आला आहे. घोटाळेबाजांनी अंकुशला त्याचे नाव, आधार क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती पॅकेजवर असून, त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे सांगितले. हे ऐकून अंकुश घाबरला. याचा फायदा घेऊन अंकुशला तातडीने पोलिसांशी बोलण्यास सांगितले. नंतर, कॉलचे व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये रूपांतर झाले, जिथे अंकुशला पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील एका व्यक्तीने सांगितले की, तो मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहे. हे ऐकून अंकुश आणखीनच घाबरला.

अंकुश बहुगुणा डिजिटल अरेस्ट-

अधिकाऱ्याने त्याला सांगितले की तो आता ‘सेल्फ-कस्टडी’मध्ये आहे, याचा अर्थ त्याला 40 तास एकटे राहावे लागेल. त्यानंतर त्याला बाहेरील जगाशी संपर्क तोडण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची त्याची संवेदनशील माहिती मिळवली आणि दबावाखाली त्याला चुकीचे आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले. त्या लोकांनी अंकुशला 40 तास सतत कॉलवर ठेवले. त्यानंतर जवळच्या मित्रांच्या मदतीने आपण यातून बाहेर पडल्याचे तो सांगतो.