Representational picture. Credits: Pixabay

Delhi Fake Model Dating App Scam: नोएडा येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने अमेरिकन मॉडेल असल्याचे दाखवून तब्बल 700 महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुषार सिंह बिश्त असे आरोपीचे नाव आहे. तुषार याने बनावट प्रोफाइल तयार करून 700 हून अधिक महिलांची फसवणूक केली. त्यांना ब्लॅकमेलिंगसाठी त्यांचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ वापरले. शुक्रवारी सायबर पोलिसांनी पूर्व दिल्लीतील शकरपूर भागातून त्याला अटक केली.

फसवणूक कशी केली?

तुषारने व्हर्च्युअल इंटरनॅशनल मोबाइल नंबर वापरून बंबल आणि स्नॅपचॅट सारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल तयार केले. त्यांने स्वत:चे वर्णन अमेरिकेतील फ्रीलान्स मॉडेल म्हणून केले आहे. जो भारत भेटीसाठी आला होता. ब्राझिलियन मॉडेलचे फोटो चोरून त्याने आपले नाव लावले होते.

18 ते 30 वयोगटातील महिला टार्गेट 

18 ते 30 वयोगटातील महिलांना टार्गेट करून तुषार त्यांच्याशी मैत्री करायचा आणि वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ मागायचा. पूर्वी हे सर्व वैयक्तिक आनंदासाठी केले जात होते. परंतु हळूहळू त्याने हा ब्लॅकमेलिंगचा एक व्यवसाय बनवला. जर एखाद्या महिलेने पैसे देण्यास नकार दिला तर तो तिचे फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाइन लीक करण्याची किंवा डार्क वेबवर विकण्याची धमकी द्यायचा.

पीडितांची कहाणी

मिळालेल्या माहितीनुसार, तुषारने बंबलवर 500 हून अधिक महिला आणि स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲपवर 200 हून अधिक महिलांना टार्गेट केले. 13 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यीने सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण उघड झाले. तिने सांगितले की जानेवारीमध्ये तिची भेट तुषारसोबत बंबलवर झाली. जिथे तिने स्वत:ची ओळख अमेरिकन मॉडेल म्हणून केली. मैत्रीनंतर, संभाषण व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटकडे वळले. जिथे विद्यार्थ्याने तुषारवर विश्वास ठेवला आणि तिचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.

यानंतर तुषारने विद्यार्थिनीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि पैसे न दिल्यास तिचा व्हिडिओ लीक करू, अशी धमकी दिली. सुरुवातीला विद्यार्थिनीने थोडीफार रक्कम दिली, मात्र मागणी वाढल्याने तिने कुटुंबीयांना कळवले आणि तक्रार दाखल केली.

तपास आणि अटक

सायबर पोलिसांनी एक टीम तयार केली. पोलिसांनी तुषारकडून एक मोबाईल फोन, बनावट आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर आणि 13 वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड जप्त केले. फोनमध्ये 60 हून अधिक महिलांसोबत चॅट रेकॉर्ड आणि इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले.

हे प्रकरण सायबर गुन्हे आणि डेटिंग प्लॅटफॉर्मच्या वाढत्या धोक्यांवर प्रकाश टाकते. लोकांनी सावध राहावे आणि अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.