हिंदू पंचांगामध्ये शुभकार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, असे दिवस ‘साडेतीन मुहूर्त’ (Sade Teen Muhurat) म्हणून ओळखले जातात. त्यापैकी एक मुहूर्त येत्या 7 मेला अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) नावाने साजरा होईल. वैशाख शुक्ल तृतीयेच्या साजऱ्या होणाऱ्या या दिवशी खरेदीसोबत दानाचेही फार मोठे महत्व आहे. या दिवशी केलेले दान अथवा चांगले कर्म कधीच क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचा ऱ्हास होत नाही म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. या मुहूर्तावर देव आणि पितर यांना उद्देशून कर्मे केली जातात, ही कर्मे देखील अविनाशी ठरतात.
हिंदू धर्मात प्रत्येक सणाला दानाचे महत्व आहे. त्यात अक्षय तृतीयेदिवशी तर हे महत्व अजून वाढते. दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही असे म्हणतात, दानाचा गुण हा सर्वात प्रशंसनीय मानला आहे. मात्र दान घेणारी व्यक्ती गरीब, सद्वर्तनी, सदाचारी, मेहनती, प्रेमळ, सहृदयी, पवित्र आणि ज्ञानी असावी. योग्य आणि अयोग्य यासंबंधीच्या अज्ञानामुळे तो दानधर्म निष्फळ ठरू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध दानांचे महत्व सांगितले आहे.
> उदककुंभाचे दान – आपल्या शरीरातीत सर्व इच्छा, वासना, आसक्ती कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे. त्यानंतर आपला देह आसक्तीविरहीत करून सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे. यामुळे आपल्या पापांचा ऱ्हास होतो.
> तिलतर्पण - देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय.
> धन – तुम्हाला जितके शक्य असेल तितके सत्पात्रे दान संत, धार्मिक कार्य करणार्या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्या तसेच धर्माविषयीचे उपक्रम राबवणाऱ्या आध्यात्मिक संस्था यांना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे.
> अन्नदान – या दिवशी गरीब तथा, भुकेल्या लोकांना अन्नदान केल्याने आपल्या घरात अन्नाची कमतरता राहत नाही. (हेही वाचा: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)
> या दिवशी सकाळी आंघोळीनंतर, ब्राह्मणांना पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच अथवा फळांचे दान द्यावे.
> या दिवशी सत्तू खाणे आवश्यक आहे. या दिवशी वसंत ऋतुचा अंत आणि ग्रीष्म ऋतुचा प्रारंभ होतो, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले घडे, पादुका, चटई, गहू, टरबूज सत्तु, इत्यादि गोष्टींचे दान अतिशय पुण्यदायक मानले आहे.