Mumbai Court Grants Bail To Rana Kapoor: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन मंजूर; 4 वर्षानंतर आले तुरुंगातून बाहेर
Rana Kapoor (PC -Wikipedia)

Mumbai Court Grants Bail To Rana Kapoor: येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांना कथित कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई न्यायालयाकडून जामीन मिळाला (Mumbai Court Grants Bail) आहे. त्यानंतर काही तासांनंतर राणा कपूर यांची तुरुंगातून सुटका झाली. राणा कपूरला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मार्च 2020 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

येस बँकेतील कथित फसवणुकीप्रकरणी ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राणाविरुद्ध एकूण आठ गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईच्या नवी मुंबई शेजारील तळोजा कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये त्याच्याविरुद्धची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. याआधी त्यांना सात प्रकरणात जामीन मिळाला होता. (हेही वाचा -Yes Bank Case: येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांचा लंडनमधील 127 कोटी रुपयांचा फ्लॅट 'ईडी'कडून जप्त)

सीबीआय प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी कपूर यांना जामीन मंजूर केला. कपूर यांचे वकील राहुल अग्रवाल यांनी सांगितलं की, बचाव पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांच्या अशिलाला जामिनावर सोडले. त्यांच्या अशिलाने आधीच चार वर्षे तुरुंगात काढली आहेत. याशिवाय, सीबीआयने या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यासाठी अद्याप कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा दावा त्यांनी केला. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कपूर यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सायंकाळी 7 वाजता सुटका करण्यात आली. (CBI Raid: येस बँक फसवणुक प्रकरणी सीबीआयचे 3 रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे)

एजन्सीने दावा केला होता की कपूर यांनी ब्लिस अबोड प्रायव्हेट लिमिटेड या फर्मद्वारे, जिथे त्यांची पत्नी संचालक आहे, नवी दिल्ली येथे मालमत्ता विकत घेतली. कपूर यांनी येस बँकेकडे मालमत्ता गहाण ठेवली होती आणि तिचे वास्तविक मूल्य 685 कोटी रुपयांच्या तुलनेत 378 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दरम्यान, येस बँकेने अवंथा ग्रुपच्या विविध कंपन्यांना 2,500 कोटी रुपयांच्या क्रेडिट सुविधांचा विस्तार केला होता आणि त्याव्यतिरिक्त, एआरएलला 400 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.