World's First 3D-Printed Temple (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामधील तेलंगणा (Telangana) राज्यात जगातील पहिले 3D प्रिंटेड हिंदू मंदिर (3D Printed Hindu Temple) बांधले जात आहे. सिद्धीपेटमधील बुरुगुपल्ली येथे चरविथा मेडोज (Charvitha Meadows) या व्हिलामध्ये हे मंदिर उभारले जात आहे. तब्बल 3,800 स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या या मंदिरात प्रामुख्याने तीन भाग बांधले जात आहेत. हे मंदिर स्थानिक इन्फ्राटेक कंपनी अप्सुजा इन्फ्राटेकच्या (Apsuja Infratech) माध्यमातून बांधले जात आहे. अप्सुजा इन्फ्राटेकने थ्रीडी प्रिंटेड बांधकामासाठी सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स (Simplyforge Creations) सोबत करार केला आहे.

अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्ण जीदिपल्ली यांनी सांगितले की, मंदिरात तीन गर्भगृहे बांधण्यात आली आहेत. ज्यामध्ये पहिला मोदकाचा आकार आहे जो गणेशाला समर्पित आहे. दुसरे गर्भगृह चौकोनी आकाराचे आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे, तर तिसरे गर्भगृह कमळाच्या फुलाच्या आकाराचे आहे, जे माता पार्वतीला समर्पित आहे.

याआधी मार्चमध्ये, सिम्पलीफोर्ज क्रिएशन्सने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने दोन तासांपेक्षा कमी कालावधीत भारतातील पहिला प्रोटोटाइप ब्रिज बनवला होता. सिप्लिफोर्ज क्रिएशन्सचे सीईओ ध्रुव गांधी यांनी सांगितले की, या मंदिराच्या बांधकामात या पुलाचा वापर करण्यात आला आहे. या पुलाची संकल्पना आणि डिझाइन प्रोफेसर केव्हीएल सुब्रमण्यम आणि आयआयटी हैदराबादमधील त्यांच्या सिव्हिल इंजिनीअरिंग ग्रुपच्या संशोधकांनी बनवले आहे. (हेही वाचा: Goa-Mumbai Vande Bharat Train: देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनचा मनमोहक व्हिडीओ; घडणार निसर्गरम्य प्रवास)

हा पूल मंदिराच्या आतील पादचाऱ्यांच्या वापरासाठी बसवण्यात आला आहे. तो मंदिराच्या उद्यानाच्या परिसरात वापरण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला आहे, ज्यावरून पादचाऱ्यांची ये-जा असते. ध्रुवने असेही सांगितले की टीम आता देवी पार्वतीला समर्पित कमळाच्या आकाराच्या मंदिरावर काम करत आहे. मंदिराचा घुमट मोदकासारखा बनवणे फार सोपे नव्हते, तरीही टीमने हे काम अतिशय  कमी वेळात पूर्ण केले.