![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/gjhjdx-37-.jpg?width=380&height=214)
Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला यावेळी मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अनपेक्षित पराभवाने अनेक राजकीय विश्लेषकांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राजकारणात एकेकाळी क्रांतिकारी बदल घडवून आणणारा आप पक्ष आता सत्तेबाहेर जाणार आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून राजकारणात प्रवेश करणारे अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदाच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. तसेच आपचे अनेक दिग्गज नेत्यांचा देखील दारूण पराभव झाला आहे. अखेर अशी कोणती कारण आहेत, ज्यामुळे आपला विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा फटका बसला आहे? ही कारण आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव होण्यामागील कारण -
अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप -
दिल्लीतील सत्तेतील भ्रष्टाचार निर्मूलन करण्याचे आश्वासन देऊन अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांचे अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. यासोबतच अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोपही झाला होता. मुख्यमंत्री असताना या आरोपांमुळे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हेही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले. यामुळे सामान्य जनतेमध्ये आम आदमी पक्षाची स्वच्छ प्रतिमा भ्रष्टाचारात गुंतलेला पक्ष म्हणून उदयास आली. त्यामुळे आपच्या पराभवामागे हे प्रमुख कारण आहे.
मोहल्ला क्लिनिक मॉडेलची घसरणारी विश्वासार्हता -
केजरीवाल सरकारने मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी रुग्णालयांचे मॉडेल जाहीर केले होते. परंतु दिल्लीत आरोग्य सेवांची वाईट अवस्था पाहून दिल्लीकरांची निराशा झाली. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये कमकुवत सुविधा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळावे लागले. यामुळे सामान्य जनतेमध्ये आप सरकारबद्दलची नाराजी वाढली. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही, त्यांचे लक्ष दारूवर होते...'; दिल्ली निकालांवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया)
दिल्लीतील खराब रस्ते -
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात लोकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे दिल्लीतील खराब रस्ते आणि गल्ल्या. दिल्लीतील गल्ल्यांमध्ये गॅस आणि पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. पण त्यांची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली नाही. याशिवाय, दिल्लीतील अनेक रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे आप सरकारच्या या सर्व गोष्टींवर दिल्लीकर नाराज होते.
दिल्लीतील पाणीपुरवठ्याची समस्या -
आम आदमी पक्षाच्या सरकारमधील खराब पाणीपुरवठा व्यवस्थेबद्दलमुळे दिल्लीकर संतापले होते. दिल्लीकरांना जो पाणीपुरवठा केला जात होता, ते पाणी अत्यंत खराब होते. दिल्ली सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्यावर महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीतील पाण्याची समस्या न सोडवल्याने दिल्लीकरांनी आपला कौल बदलला.
पाणी संकट आणि प्रदूषण -
आपने दिल्लीत यमुना नदीच्या स्वच्छतेबाबत मोठी आश्वासने दिली होती. परंतु, यमुना नदीची स्वच्छता केवळ बोलाचा भात आणि बोलाची कढी अशीचं राहिली. निवडणुकीपूर्वी यमुना नदीच्या पाण्यावर आलेल्या फेसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे आप सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाण्याचे संकट, वाढते प्रदूषण आणि खराब सांडपाणी व्यवस्था यामुळे दिल्लीकर नाराज झाले.