Union Minister Ananth Kumar (Photo credit: IANS)

प्रदीर्घ काळापासून कर्करोगासारख्या (कॅन्सर) दूर्धर आजाराशी लढा देणारे केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे निधन झाले आहे. ते ५९ वर्षांचे होते. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्यांच्यावर लंडन आणि न्यू यॉर्क येथे उपचार सुरु होते. मात्र, २० ऑक्टोबरला त्यांना बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अनंत कुमार यांचे पार्थीव बंगरुळू येथील नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात अंति दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अनंत कुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी शुक्रवारी माहिती देताना सांगितले होते की, अनंत कुमार यांची प्रकृती ठिक असून, लवकरच ते पूर्ववत होती. मात्र,अचानकपणे त्यांची प्रकृती पुन्हा कशी बिघडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. कँन्सरच्या आजारासोबत त्यांना काही इन्फेक्शन झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रकृती पुन्हा एकदा अचानक बिघडल्यामुळे अनंत कुमार यांना कृत्रीम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) पुरवला जात होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

अनंत कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राष्ट्रपती रामाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले. रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, 'केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दु :ख झाले. त्यांचे असे अकाली जाणे हे देश आणि खास करुन कर्नाटकच्या लोकांसाठी मोठा धक्का आहे. त्यांचे कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत माझ्या संवेदना कायम आहेत.'

पंतप्रधान मोदींनीही आपल्या 'शोकसंदेशात म्हटले आहे, ' माझे सहकारी आणि दोस्त अनंत कुमार यांच्या निधनाबाबतचे वृत्त ऐकूण फार दु:ख झाले. ते एक शानदार नेते होते. ज्यांनी तरुणपणातच राजकारणात पाऊल ठेवले. अत्यंत कष्ट आणि प्रामाणीकपणे त्यांनी लोकांची सेवा केली. चांगल्या कामासाठी त्यांना नेहमीच लोक स्मरणात ठेवतील.

२२ जुलै १९५९मध्ये जन्मलेले अनंत कुमार हे १९९६मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडूण आले. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले व नंतर ते विद्यार्थी संघटनांमधून कार्यकत झाले. पुढे भाजपमध्ये प्रवेश करुन अखेरच्या टप्प्यात ते केंद्रीय मंत्रीही झाले.