बिहार: चोरट्यांनी ट्रक हायजॅक करून लुटला 3.5 लाखाचा कांदा
Onions (Photo Credits: IANS)

आतापर्यंत तुम्ही सोनं, चांदी, पैसे, आदी मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु, बिहारमध्ये चक्क कांदा चोरीची (Onion Theft) घटना घडली आहे. बिहारमध्ये 6 शस्त्रधारी गुंडांनी कांद्याने भरलेला ट्रक अडवून संपूर्ण ट्रकमधील कांदा लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी ट्रकमधील तब्बल 3 लाख 5 हजार रुपये किमतीचा 5 टन कांदा लुटून पळ काढला आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली.

या 6 चोरट्यांनी कांद्याने भरलेला ट्रक अडवला. त्यानंतर कांदा ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरांनी ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर तेथून पळ काढला. या ट्रकमध्ये 50 किलो वजनाची एकूण 102 पोती होती. स्थानिक बाजारात या कांद्याची किंमत प्रतिकिलो 100 ते 120 रुपये इतकी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा - मुंबईतील डोंगरी बाजारात 168 किलो कांद्याची चोरी; चोरांचा तपास सुरु)

चोरट्यांनी ट्रक चालक देश राज याला बंदुकीचा धाक दाखवत मारहाणही केली. त्यानंतर त्याला आपल्या कारमध्ये बसवलं. 4 तासानंतर या ट्रक चालकाला एका अज्ञात स्थळी सोडून देण्यात आलं. तेथे त्याला 'ट्रक पुसौली येथील पेट्रोल पंपाजवळ मिळेल', असं सांगण्यात आलं. त्यानंतर या ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकचालकाकडून लिफ्ट घेत हे ठिकाण गाठलं. ट्रक चालकाला संबंधित ठिकाणी आपला ट्रक मिळाला. त्यानंतर त्याने पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.