Leopards Increased in India: भारतात गेल्या 4 वर्षात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांची वाढ; मध्य प्रदेशात सर्वाधिक तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
Leopards (Photo Credit - Wikimedia Commons)

Leopards Increased in India: भारतात गेल्या चार वर्षात बिबट्यांची (Leopards) संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. 2014 मध्ये देशात सुमारे 8 हजार बिबट्या होते. आता त्यांची संख्या 12 हजाराहून अधिक झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. स्टेट्स ऑफ लेओपार्ड इन इंडिया, 2018 असं या अहवालाचे नाव आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सांगितलं की, फोटो काढण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून बिबट्यांची संख्येचा अंदाज लावण्यात आला आहे. भारतात वाघ, आशियाई वाघ आणि आता बिबट्यांची संख्या वाढत आहेत. यावरून देशात पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण होत असल्याचे स्पष्ट होते.

बिबट्यांच्या संख्येत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर -

अहवालानुसार, 2018 मध्ये भारतात बिबट्यांची संख्या 12,852 होती. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 3,421 बिबट्या सापडले. म्हणजेच एक चतुर्थांशपेक्षा अधिक बिबट्या मध्य प्रदेशात आहेत. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रात ही संख्या अनुक्रमे 1,783 आणि 1,690 वर पोहोचली आहे. (हेही वाचा - Jallikattu: जल्लीकट्टू खेळाचे आयोजन करण्यास तामिळनाडू सरकारची परवानगी; कोरोना विषाणू नियमांचे करावे लागेल पालन)

मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या सर्वाधिक -

भारतातील बिबट्या प्रामुख्याने मध्य भारत, पूर्व घाट, पश्चिम घाट, शिवालिक, गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्येकडील डोंगराळ भागात आढळतात. मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या 8,071 म्हणजेच सर्वाधिक आहे. या प्रदेशात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्य आहेत. त्यानंतर, पश्चिम घाट (कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि केरळ) भागात 3,387 बिबट्या सापडले आहेत. शिवालिक आणि गंगेच्या मैदानावर (उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार) बिबट्यांची संख्या 1,253 इतकी आहे. ईशान्येकडील (अरुणाचल प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल) डोंगराळ भागात 141 बिबट्या आहेत.

बिबट्या खाण्याच्या आवश्यकतेनुसार जास्त शेती असलेल्या तसेच शहरी भागातजवळ आढळतात. बिबट्या ही प्रजननशील प्रजाती आहे. त्यांची लोकसंख्या वार्षिक 10% दराने वाढते. तथापि, बिबट्यांची संख्या काही वर्षांपूर्वी लक्षणीय घटली होती. एका अभ्यासानुसार, मागील 120 ते 200 वर्षात भारतामध्ये बिबट्यांची संख्या 75 ते 90 टक्क्यांनी कमी झाली होती.

भारतीय बिबट्या -

जगात बिबट्याच्या 9 उपप्रजाती आहेत. आफ्रिकन बिबट्या सर्वाधिक मोठ्या क्षेत्रात आढळतात. हा मोरोक्को आणि उप-सहारा आफ्रिकेत आढळतो. यानंतर भारतीय बिबट्या अधिक सापडतात. हे म्यानमार आणि तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. याशिवाय जावन, आर्बियन, पर्शियन, अमूर, इंडोचिनी आणि श्रीलंका प्रजातीचे बिबट्या जगाच्या वेगवेगळ्या भागात आढळतात.