Representational Image | (Photo Credits: PTI)

मैत्रिणींसोबत पार्कमध्ये खेळायला गेलेल्या एका 13 वर्षाच्या मुलीला झोपाळ्याची धडक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना राजसमंद (Rajsamand) परिसरातील पाटबंधारे विभागाच्या एका पार्कमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

ममता असे मृत मुलीचे नाव आहे. राजसमंद परिसरातील पाटबंधारे विभागाच्या एका पार्कजवळ राहायला आहे. ममता आपल्या मैत्रिणींसोबत दररोजप्रमाणे पार्कमध्ये खेळायला गेली होती. यावेळी तिच्या 7 ते 8 मैत्रिणी एकत्र झोपाळ्यावर बसून झोका घेत होत्या. तर, ममता त्यांना हाताने झोका देत होती. मात्र, ममता झोका देताना झोपाळ्यासोबत पुढे गेली. त्यानंतर मागे येत असताना तिचा तोल ढासळला आणि ती खाली पडली. यावेळी पुढे गेलेला झोपाळा परत येवून तिला जोरदार धडकल्याने तिची मान तुटली. परत हा झोपाळा मागे आल्याने तिच डोके फुटून तिला गंभीर दुखापत झाली. यावेळी पार्कमध्ये फिरायला आलेल्या लोकांना घडलेला प्रकार पाहिला आणि तिला त्वरित जवळील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे देखील वाचा- त्रिपुरामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप

ही घटना अतिशय हृदयद्रावक असून याचा ममताच्या पालकांना जोरदार धक्का बसला आहे. रोजच्या प्रमाणे पार्कमध्ये खेळायला गेलेल्या ममतासोबत अशी घटना घडेल, असा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. मात्र, मुलीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.