Remove Bournvita as Health Drink: बोर्नव्हिटासारखे पदार्थ हेल्थ ड्रिंक्स नाहीत, या पदार्थांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील या श्रेणीतून काढून टाका; केंद्राचा कंपन्यांना आदेश
Bournvita (PC - Facebook)

Remove Bournvita as Health Drink: वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मवरून 'हेल्थ ड्रिंक्स' (Health Drink) च्या श्रेणीतून बोर्नव्हिटा (Bournvita) सह सर्व पेये काढून टाकण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2 एप्रिल रोजी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर विकले जाणारे खाद्यपदार्थ योग्य श्रेणीमध्ये ठेवण्यास सांगितले होते.

कोणत्याही पेयाची विक्री वाढवण्यासाठी हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक या शब्दांचा गैरवापर करू नये, असेही प्राधिकरणाने सांगितले होते. FSSAI ने स्पष्ट केले आहे की, 'हेल्थ ड्रिंक' हा शब्द FSS कायदा 2006 किंवा त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार कुठेही परिभाषित किंवा प्रमाणित केलेला नाही. (हेही वाचा -NCPCR On Bournvita: एनसीपीसीआरचा बॉर्नविटा उत्पादक मॉन्डेलेझ इंटरनॅशनल इंडिया कंपनीला दणका; तथ्यहीन दावे आणि भ्रामक जाहीराती हटविण्याचे आदेश)

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने गेल्या वर्षी बोर्नविटा उत्पादन कंपनी माँडेलेझ इंटरनॅशनल इंडिया लिमिटेडला नोटीस पाठवली होती. त्यात म्हटले होते की, या उत्पादनात साखरेचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी आहेत. असे काही घटक आहेत जे मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कंपनीने आपल्या उत्पादनांच्या सर्व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, पॅकेजिंग आणि लेबल्सचे पुनरावलोकन करून त्या मागे घ्याव्यात.

मीडिया रिपोर्ट्समधील बाजार अभ्यासानुसार, भारतीय एनर्जी ड्रिंक्स आणि स्पोर्ट्स ड्रिंक्सचा सध्याचा बाजार आकार $ 4.7 अब्ज आहे, जो 2028 पर्यंत 5.71% च्या CAGR वाढीसह वाढण्याची अपेक्षा आहे. हेल्थ ड्रिंक्सच्या श्रेणीतून बोर्नव्हिटा आणि इतर पेये काढून टाकल्यानंतर, एक प्रश्न लोकांच्या मनात आहे की, चॉकलेट पावडर घालून मुलांना दूध पाजणे आरोग्यदायी आहे का? मुलांना त्याची खरोखर गरज आहे का? असे अनेक प्रश्न पडले आहेत.