Prime Minister Narendra Modi (PC - ANI)

PM Modi Chennai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) त्यांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी चेन्नईला पोहोचले. येथे त्यांनी बेंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे सह (Bengaluru-Chennai Expressway) 31,000 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली. कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “तामिळनाडूमध्ये येणे नेहमीच आश्चर्यकारक असते. या राज्यातील लोक, संस्कृती आणि भाषा अतुलनीय आहेत. तमिळ भाषा शाश्वत आहे आणि तमिळ संस्कृती वैश्विक आहे. चेन्नईपासून कॅनडापर्यंत, मदुराईपासून मलेशियापर्यंत, नमक्कलपासून न्यूयॉर्कपर्यंत, सालेमपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोंगल आणि पुथंडूचे प्रसंग मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तामिळनाडूच्या विकास प्रवासातील आणखी एक गौरवशाली टप्पा साजरे करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. 31,000 कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी झाली आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, '5 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे आधुनिकीकरण आणि विकास करण्यात येत आहे. ज्या देशांनी पायाभूत सुविधांना सर्वाधिक महत्त्व दिले, ते देश विकसनशील देशांमधून विकसित झाले. उच्च दर्जाची आणि टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.' (हेही वाचा - West Bengal State University: ममता बॅनर्जी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी आता मुख्यमंत्री असणार राज्याच्या सर्व विद्यापीठांचे कुलपती)

काही वर्षांपूर्वीपर्यंत पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, वीज आणि पाणी इतकचं मर्यादीत होतं. आज आम्ही देशाच्या गॅस पाइपलाइनच्या विस्तारासाठी काम करत आहोत. प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्याची आमची दृष्टी आहे. तमिळ भाषा आणि संस्कृती आणखी लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. या वर्षी जानेवारीमध्ये, चेन्नईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन झाले. नवीन कॅम्पस संपूर्णपणे भारत सरकारद्वारे अर्थसहाय्यित आहे. बनारस हिंदू विद्यापीठात तामिळ अभ्यासावरील 'सुब्रमण्य भारती पीठ'ची घोषणा नुकतीच करण्यात आली. BHU माझ्या मतदारसंघात असल्याने विशेष आनंद झाला, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तत्पूर्वी चेन्नईला पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री दुराईमुरुगन आणि डॉ. के. पोनमुडी हेही उपस्थित होते. चेन्नईला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रोड शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला.