भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करणार? नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या वक्तव्यांनंतर नव्या चर्चांना उधाण
Sharad Pawar And Narendra Modi (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाली असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या अडीचशेवे सत्र सोमवारी सुरु झाले. या सत्राच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्तास्थापनेच्याबाबतीत शिवसेनेला कोणताच शब्द दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप- राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, अशा चर्चांना उधाण आले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन युतीत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चर्चा - विचार विनिमय सुरू आहे. नुकतीच शरद पवार यांची सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, सत्ता संदर्भात आमची शिवसेनेची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शरद पवार यांनी आश्चर्यचकीत करणारे वक्तव्य केले आहे तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात भाजप- राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागेवर विजय मिळवता आला आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 54 जागा जिंकल्या आहेत. त्यानुसार भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास 159 आमदार संख्येच्या बळावर त्यांना सहज बहुमत सिद्ध करता येईल. त्याचबरोबर भाजपला 14 लहान मोठ्या पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आमदारांची संख्या संख्या 173 पर्यंत जाईल. हे देखील वाचा- दिल्ली: सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? सरकार स्थापन होणार की नाही? काय म्हणाले शरद पवार?

जर राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तरीदेखील भाजपला 2014 च्या निवडणुकीप्रमाणे बहुमत सिद्ध करता येऊ शकते. विश्वासदर्शक ठराव जेव्हा विधीमंडळाच्या पटलावर येईल तेव्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार अनुपस्थित राहिल्यास भाजपाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार विधीमंडळात गैरहजर राहिल्यास एकूण आमदारांची संख्या 234 असेल. त्यावेळी भाजपला 145 नव्हे तर, 117 जागांची गरज लागणार. सध्या भाजपाचे 105 आणि 14 अपक्ष आमदार अशी एकूण संख्या 119 आहे. त्यामुळे भाजपाला सहज बहुमत सिद्ध करता येईल.