होणार.. होणार असे म्हणता म्हणता चक्क चार वर्षे उलटून गेली. आता तर, सत्ताकाळातील अखेरचे पर्व सुरु झाले. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या. इतक्या की, केवळ १३च महिन्यांचा कालावधी बाकी राहिला. असे असताना पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा पाळणा हालणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. अर्थात, खुर्ची मजबूत करायची असेल, पक्षांतर्गत आणि राज्यशकट हाकताना सरकार म्हणून डॅमेज कंट्रोल करायचे असेल तर, मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर कामी येते. त्यामुळे गेले बराच काळ या गाजराची राजकीय वर्तुळात नेहमी चर्चा असते. मात्र, सध्या सुरु असलेली मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा हे केवळ गाजर नसून, ती वास्तवातही उतरणार असल्याचे समजते. या विस्तारात २०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनिती असणार यात काहीच शंका नाही. असे असले तरी, या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाची खुर्ची जाणार याबाबत उत्सुकता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार जर खरोखरच झाला तर, उर्वरीत १३ महिन्यांमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी सामना खेळत कामगिरी सुधारण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या विश्वासातील लोकांची वर्णी लावू शकतात. त्यामुळे अनेकांनी आपापली ताकद लावायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या कथीत विस्तारात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून डॉ.संजय कुटे, डॉ.अनिल बोंडे, प्रशांत बंब, परिणय फुके, राजेंद्र पटणी या आमदारांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे.
चर्चेतील चेहरे
दरम्यान, भाऊसाहेब फुंडकर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागू शकते. तर, विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊनही पदभार स्वीकारने टाळून नाराजी व्यक्त करत असलेलेल बुलडाणा जिल्ह्यातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचीही सोय करण्यात येऊ शकते. पण, असे असले तरी, सोशल इंजिनिअरींग सांभाळायचे तर, कुणबी समाजाचे असलेले कुटे यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसऱ्या बाजू विदर्भातील दोन विद्यमान मंत्र्यांना डच्चू देत रिक्त जागी डॉ.अनिल बोंडे, परिणय फुके यांचा विचार केला जाऊ शकतो.
मित्रपक्षांचा वाटा किती?
२०१४मध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दावर विस्वास ठेऊन भाजपसोबत आलेल्या मित्रपक्षांनाही फडणवीस मंत्रिमंडळात फार स्थान नाही. मित्रपक्षांपैकी केवळ महादेव जानकर यांचे कॅबिनेट पद वगळता बाकीच्यांचे हात कोरडेच आहेत. नाही म्हणायला विनायक मेटे (शिवसंग्राम) यांच्याकडे शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आणि रिपाईंच्या आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रीपद आहे. पण, त्यामुळे नाराजी दूर होणे कठीण आहे. कदाचित त्याचमुळे रिपाइंला मंत्रिपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ठाणे येथे दिले असावे. अतुल सावे, मनीषा चौधरी, भीमराव धोंडे देवयानी फरांदे आणि योगेश टिळेकर यांची नावेही मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत आहेत.
शिवसेनेचे काय?
दरम्यान, असे असले तरी, भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात काय स्थान असेल? याबाबत मात्र स्पष्ट महिती मिळू शकली नाही. पण, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर २०१९साठी शिवसेना-भाजप युती होणार की नाही याबाबतचे स्पष्ट संकेत मिळतील.
आयारामांचाही विचार होणार?
दरम्यान, सत्ता मिळविण्यासाठी जोरदार इनकमिंग तर केले. पण, या आयारामांचे पुढे करायचे काय हा सर्वात मोठा प्रश्न सध्या भाजप नेतृत्वासमोर आहे. कारण, एकूण आयारामांपैकी बरेच आयाराम तसे तगडे आहेत. त्यांना संत्तेचे पाणी दिले नाही तर, भविष्यात ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन घरवापसी करतील. तसेच, पुन्हा एकदा भाजपच्या नाकीनऊ आणतील याची भीती नेतृत्वाला आहे. त्यामुळे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या किसन कथोरे, डॉ. अनिल बोंडे, अमल महाडिक यांच्यापैकी एकाला मंत्रिपदी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तर रंगलीय. पण, नेमका तो खरंच होणार का? हे मात्र केवळ देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनाच माहित.