Prime Minister Modi and Congress President Rahul Gandhi (photo credit: file photo)

Exit poll results: मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव. जगभरातील सर्वात मोठा लोकशाही देश अशी ओळख असणाऱ्या आपल्या भारतात हा उत्सव लोकसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने सात टप्प्यात पार पडला. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी व्यक्त केलेल्या अंदाजात बहुतांश एक्झिट पोल्सनी NDA ला बहुमत मिळण्याचा अंदाजव वर्तवला आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता हे एक्झिट पोल्स वर्तवतात. अर्थात हे अंदाज खरे ठरणार की, केवळ अंदाजच राहणार याबाबत 23 मे रोजी वास्तव कळणार आहे. मात्र, एनडीएला बहुमत मिळण्याच्या शक्यतेत काँग्रेसचा नकारात्मक प्रचार हा मुद्दा प्रमुख असल्याची चर्चा आहे. काँग्रेस कँम्पेन मतदानांवर किती प्रभावी ठरले याबाबतची ही काही निरिक्षणे.

मोदींवरील तीव्र टीकेचा नकारात्मक परिणाम?

लोकसभा निवडणूक 2014 नंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पुढे आले. बालकोट एअर स्ट्राईक नंतर ही प्रसिद्धी अधिकच वाढल्याचे प्रसारमाध्यमे सांगतात. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उडवत लक्ष्य केले. नेमकी हीच गोष्ट काँग्रेससाठी मारक ठरल्याचे एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधणं ही गोष्ट बहुदा मतदारांना आवडली नसावी.

भ्रष्टाचार विरोधी ही पंतप्रधान मोदी याची प्रतिमा

भ्रष्टाचार विरोधी व्यक्तिमत्व अशी प्रतिमा उभी करण्यात पंतप्रधान मोदी हे चांगले यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री असल्यापासून ते पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. त्या तुलनेत UPA 2 मध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आली होती. (हेही वाचा, लोकसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वीच मतांमध्ये फेरफार? खासगी वाहने आणि दुकानांमध्ये ईव्हीएम सापडल्याने वाद (Video))

तीन राज्यांमध्ये काँग्रेसला अती आत्मविश्वास

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तांतर करत काँग्रेसने भाजपला राज्याच्या सत्तेतून बाहेर काढले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही ही राज्ये आपल्यालाच साथ देतील असा आत्मविश्वास काँग्रेसमध्ये आहे. मात्र, एकूण स्थिती पाहता सत्ता हाती असूनही काँग्रेसला या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारात फारशी चमकदार कामगिरी करताना नाही आली हे वास्तव नाकारता नाही येणार.

दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालापूर्वी व्यक्त केली जाणारी मतं ही केवळ जर, तर आणि शक्यतांच्या जोरावरच आहेत. वास्तव चित्र मात्र 23 मे रोजीच प्रत्यक्षात उतरणार आहे.