BJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत
बीजेपी (Photo Credits: IANS)

भारतीय जनता पक्षामध्ये आज नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी आज निवडणूक देखील होणार आहे. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. सध्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (Jagat Prakash Nadda) यांचं नाव आघाडीवर आहे. अमित शाह  यांच्यावर मोदी सरकार मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी पडल्यानंतर भाजपामध्ये नव्या अध्यक्षाची निवड होणार याची चर्चा सुरू झाली.

भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज होणार्‍या निवडणूकीमधेय जेपी नड्डा यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमित शहांनंतर जे.पी. नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. अमित शहा यांनीच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नव्या व्यक्तीकडे द्यावी यासाठी विनंती केली होती. भाजपा पक्षामधील ' एक व्यक्ती एक पद' या धोरणानुसार आता अमित शाह यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी आता नव्या व्यक्तीच्या खांद्यावर दिली जाणार आहे.

जेपी. नड्डा यांचं नाव सध्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शर्यतीमध्ये पुढे आहे. ते आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वसनीय चेहरा म्हणून ओळखले जातात. जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे. 58 वर्षीय जेपी नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील आहेत.