Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात 12 रुपयांनी वाढ करावी लागणार; ICICI सिक्युरिटीजच्या अहवालात दावा
Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Petrol Diesel Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 115 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. तसेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी दबावामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून चढ्या भावाने कच्चे तेल आयात करावे लागत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री करून तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांना 16 मार्च 2022 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 रुपयांपेक्षा जास्त वाढ करावी लागेल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे की, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांना ब्रेक-इव्हन तोटा दूर करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी प्रति लीटर 12.1 रुपये दरवाढीची आवश्यकता आहे. तेल कंपन्यांसाठी मार्जिन समाविष्ट केल्यानंतर किंमती 15.1 रुपयांनी वाढवण्याची गरज आहे. (वाचा -Vehicle Fitness Certificate: नवा नियम! वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेट आणि मोटार वाहन नोंदणी चिन्ह दाखवणे आवश्यक)

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी नऊ वर्षांत प्रथमच USD 120 प्रति बॅरलच्या वर वाढल्या आणि शुक्रवारी USD 111 वर किंचित कमी झाल्या. किंमत आणि किरकोळ दरांमधील अंतर वाढले आहे. तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (PPAC) कडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी भारतातील कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल $117.39 पर्यंत वाढली, जी 2012 नंतरची सर्वाधिक आहे. तर नोव्हेंबर 2021 च्या सुरुवातीला कच्च्या तेलाची भारतीय बास्केट किंमत प्रति बॅरल सरासरी $ 81.5 होती.

पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही -

मात्र, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. खरं तर, देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून 10 मार्चला निकाल लागणार आहेत. 7 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.