File image of the RBI | (Photo Credits: PTI)

आर्थिक वर्ष 2018 – 2019 मध्ये बँकांची तब्बल 71,500 कोटी रुपयांची फसवणूक (Bank Fraud) झाल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूकीची एकूण 6,800 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत माहिती दिली आहे. 2017-18 आर्थिक वर्षामध्ये 41,167.03 कोटी रुपयांच्या फसवणुकीची 5,916 प्रकरणे समोर आली होती. यावर्षी फसवणुकीचे प्रमाण 73  टक्क्यांनी वाढले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, गेल्या 11 वर्षांत 2.05 लाख कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा समोर आला आहे.

गेल्या काही वर्षांत झालेली फसवणूक - 

  • 2008-09 - 1,860.09 कोटी, 4,372 प्रकरणे
  • 2009-10 - 1,998.94 कोटींची 4,669 प्रकरणे
  • 2015-16 - 18,698.82 कोटी, 4,693 प्रकरणे
  • 2016-17 – 23, 933.85 कोटी, 5,076 प्रकरणे

याबाबत केंद्रीय बँक म्हणते, ‘आरबीआयला फसवणूकीसंदर्भात बँकांकडून मिळालेल्या माहितीबद्दल, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसमोर बँकांनी आपराधिक तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. मात्र आता कारवाईबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.’ गेल्या काही वर्षांत बँकेच्या फसवणुकीची आणि घोटाळ्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मात्र सरकारने याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. यामध्ये नीरव मोदी आणि विजय माल्या यांनी केलेल्या फसवणुकीचाही समावेश आहे. (हेही वाचा: 'जय मोदी'मुळे भारताची जगात बेअब्रू; तब्बल 78 कंपन्यांवर जागतिक बँकेकडून बंदी)

दरम्यान, मंगळवारी भाजप (BJP) सरकारच्या काळात, म्हणजेच गेल्या पाच वर्षांत 1.74 लाख कोटींच्या बँक फसवणुकीची 27,125 प्रकरणे समोर आल्याची माहिती कॉंग्रेसने दिली. याबाबतीत भाजपवर निशाणा साधत बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सध्याच्या सरकारने काही उपाय करावेत अशी मागणी करण्यात आली.