India To Become Pharmaceutical Manufacturing Hub: नवी दिल्ली येथे 26 ते 27 मे 2023 दरम्यान होणाऱ्या आठव्या 'भारतीय औषध निर्माण आणि भारतीय वैद्यकिय उपकरणे' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया करणार आहेत. फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सहकार्याने (FICCI) औषध निर्माण विभागाने परिषदेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात रसायने आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री भगवंत खुबा हे देखील सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023, तसेच वैद्यकीय उपकरणांसाठी निर्यात प्रोत्साहन परिषदेचा प्रारंभही डॉ. मांडविया यावेळी करतील. भारतीय औषध निर्माण क्षेत्र, जगाचे औषधालय म्हणून ओळखले जाते. येत्या काही वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी ते अधिक योगदान देईल असा विश्वास डॉ. मांडविया यांनी व्यक्त केला. (हेही वाचा -गेल्या 9 वर्षात चोरलेल्या 231 पुरातन वस्तू भारतात परत आणल्या, केंद्रीय मंत्री डॉ Jitendra Singh यांचे वक्तव्य)
ही वार्षिक पथदर्शी परिषद दोन दिवस होणार आहे - 26 मे 2023 हा दिवस भारतीय वैद्यकीय उपकरण क्षेत्रासाठी समर्पित असेल. शाश्वत वैद्यकिय तंत्रज्ञान 5.0: व्याप्ती आणि नवोन्मेषी भारतीय वैद्यकिय तंत्रज्ञान या संकल्पनेवर ती आधारित असेल. 27 मे 2023 रोजी भारतीय औषध निर्माण क्षेत्रासाठी समर्पित संकल्पनेवर आधारित भारतीय औषध निर्माण उद्योग: नवोन्मेषाच्या माध्यमातून मूल्य वितरण यावर ती होणार आहे.
यावेळी खालील मुख्य कार्यक्रम होणार आहेत:
उद्घाटन सत्र (26 मे 2024) -
राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण, 2023 आणि सामायिक सुविधांसाठी वैद्यकीय उपकरणांच्या क्लस्टर्ससाठी सहाय्य योजनेचा (AMD-CF) प्रारंभ, औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणांवरील अभ्यास अहवालांचे प्रकाशन, वैद्यकीय उपकरणांसाठी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे औपचारिक उद्घाटन यावेळी नियोजित आहे.
- वैद्यकीय उपकरण क्षेत्रावरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज आणि संबंधित विषयावरील परिषद सत्र (26 मे, 2023)
- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची औषध निर्माण क्षेत्रावरील गोलमेज आणि संबंधित विषयावरील परिषद सत्र (27 मे 2023)
या दोन दिवसीय परिषदेला 100 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि औषध निर्माण तसेच वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील 700 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.