Mumbai Police | (Photo Credits: File Image)

भारताची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) सध्या सायबर गुन्ह्यांच्या (Cybercrimes) वाढत्या लाटेचा सामना करत आहे. अहवालानुसार, 2024 मध्ये या गुन्ह्यांमुळे तब्बल 1,181 कोटी रुपयांचे नुकसान झाले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 350 टक्क्यांनी जास्त आहे. ऑनलाइन फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारी ठगी, याला अनेक मुंबईकर बळी ठरले आहेत. आता सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येमुळे, मुंबई पोलिसांनी नागरिकांना अशा गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी 'डिजिटल रक्षक' नावाची एक नवीन हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.

या हेल्पलाईनसाठी पोलिसांनी दोन समर्पित मोबाइल क्रमांक- 7715004444 आणि 7400086666 सुरू केले आहेत, जे 24/7 कार्यरत राहतील. नागरिक मदतीसाठी कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधू शकतात. या सेवेद्वारे, रहिवासी संशयास्पद कॉल, संदेश किंवा लिंक्सची तक्रार करू शकतात आणि फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी सरकारी कागदपत्रांची सत्यता पडताळू शकतात. हेल्पलाइनचे उद्दिष्ट जलद आणि प्रभावी प्रतिसाद देणे, आवश्यक असल्यास सायबर पोलीस किंवा स्थानिक पोलीस स्टेशन टीम पाठवणे हे आहे. विशेषतः डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना समुपदेशन आणि मार्गदर्शन देखील दिले जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितांमधील भीती कमी करण्यासाठी, त्वरित हस्तक्षेप सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षित कसे राहावे याबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना 'डिजिटल रक्षक' हेल्पलाइनचा पुरेपूर वापर करण्याचे आणि सायबर-सुरक्षित शहर तयार करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्ह्यांचे तपास कठीण आहे, कारण तक्रारी उशिरा नोंदवल्या जातात आणि गुन्हेगार दूरस्थ ठिकाणांहून काम करतात. याशिवाय, बँका आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून माहिती मिळवण्यात अडथळे येतात. (हेही वाचा: Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त)

नागरिकांनी खालील खबरदारी घ्यावी:

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 1930 वर किंवा मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा.

अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका, आणि वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.

सोशल मीडियावरील भुलविणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका.

कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल, मेसेज आल्यास समोरील व्यक्तीची सत्यता पडताळून पहा.

ऑनलाइन व्यवहारांबाबत सतर्क राहा, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी.

खात्यांसाठी कठीण पासवर्ड वापरा आणि नियमित बदल करा.