
NITI Aayog Report: भारतातील टूल्स उत्पादन उद्योग (India Tools Manufacturing) हा जागतिक पातळीवर निर्यात वाढवण्याची, लाखो रोजगार निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. तसेच, भारताला चीनच्या जागतिक वर्चस्वाला पर्याय देण्याची मोठी संधी आहे, असे NITI आयोग आणि फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (Foundation for Economic Development) यांच्या संयुक्त अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक टूल्स व्यापाराचे मूल्य 2022 मध्ये USD 100 billion होते, आणि ते 2035 पर्यंत USD 190 बिलीयन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र भारताचा हिस्सा अद्याप मर्यादित आहे—हाताने वापरण्यायोग्य टूल्समध्ये USD 600 मलियन आणि पॉवर टूल्समध्ये USD 425 मिलियन इतकीच निर्यात होते, तर चीन जवळपास 50% बाजारावर नियंत्रण ठेवतो.
जागतिक व्यापारात बदल भारतासाठी सुवर्णसंधी
चीनच्या वर्चस्वामागे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, खर्च कार्यक्षमता आणि मजबूत पुरवठा साखळी कारणीभूत आहे. पण 2016 ते 2019 दरम्यान अमेरिका सरकारने चीनवरील टॅरिफ वाढवल्याने व्यापारात बदल झाले आहेत.
'व्हिएतनामने या संधीचा फायदा घेतला असून त्यांची निर्यात दरवर्षी दुप्पट झाली आहे. याच्या तुलनेत भारताची वाढ फक्त 25% इतकी मर्यादित राहिली आहे,' असे अहवालात म्हटले आहे.
या घडामोडींमुळे आणि चीनमधील वाढते उत्पादनखर्च व जागतिक अनिश्चितता यामुळे भारताला टूल्स उत्पादन क्षेत्रात नव्याने उभे राहण्याची दुर्मीळ संधी मिळू शकते.
तीन स्तंभावर आधारित विकास धोरण
सहा महिन्यांच्या संशोधन व उद्योग प्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर, अहवालात तीन स्तंभावर आधारित धोरणात्मक आराखडा सुचवण्यात आला आहे:
- जागतिक दर्जाचे औद्योगिक क्लस्टर्स निर्माण करणे
- संरचनात्मक खर्चातील अडथळे दूर करणे
- लक्ष्यित क्षेत्रांना विशेष सहाय्य पुरवणे
या उपाययोजना भारत व प्रतिस्पर्धी देशांमधील 14–17% खर्चाच्या तफावतीवर मात करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे भारत टूल्स उत्पादनात खर्च-अदक्षतेच्या अडथळ्यांवर मात करून जागतिक स्पर्धक म्हणून उभा राहू शकेल.
अडथळे आहेत, पण मात करता येणारे
अहवालात काही प्रमुख अडथळे अधोरेखित करण्यात आले आहेत:
- उत्पादन खर्च जास्त
- मर्यादित तांत्रिक ज्ञान
- पुरेशी पायाभूत सुविधा नाहीत
तरीही, योग्य धोरणे आणि सहकार्याने या अडथळ्यांवर मात करता येऊ शकते, असे लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 2035 पर्यंत भारताला पॉवर टूल्स मार्केटमध्ये 10% आणि हात टूल्समध्ये 25% हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे, असेही अहवालात म्हटले आहे.