ChatGPT | Representational Image (File Photo)

ओपनएआयद्वारे (OpenAI) विकसित केलेले चॅटजीपीटी (ChatGPT) हे एआय-आधारित चॅटबॉट, माहिती देणे, प्रश्नांची उत्तरे देणे आणि सर्जनशील कार्ये यासाठी ओळखले जाते. आता चॅटजीपीटीने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगभरातील अ‍ॅप डाउनलोडच्या शर्यतीत, या कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉटने इंस्टाग्राम आणि टिकटॉक या सोशल मीडिया दिग्गजांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेम्स वगळता, चॅटजीपीटी हे जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप बनले आहे, ज्याने 46 दशलक्ष नवीन डाउनलोड्स नोंदवले. घिबली स्टुडिओ आर्ट टूल चॅटजीपीटीसाठी भाग्यवान ठरले. या टूलने चॅटजीपीटीला एक नवीन ओळख दिली. मार्चमध्ये घिबली स्टुडिओ आर्ट ट्रेंडमध्ये आला आणि चॅटजीपीटीनेही हा विक्रम केला.

अ‍ॅप फिगर्सच्या अहवालानुसार, चॅटजीपीटी इमेज जनरेशन टूल लाँच झाले आहे. ज्यामध्ये घिबली स्टुडिओ आर्ट टूल जोडले गेले. तेव्हापासून ते डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. मार्चमध्ये इंस्टाग्राम आणि टिकटॉकनेही खूप चांगली कामगिरी केली. पण चॅटजीपीटीकडून त्यांचा पराभव झाला. एकूण 46 दशलक्ष उपकरणांवर चॅटजीपीटी डाउनलोड करण्यात आले, त्यापैकी 13 कोटी आयओएस आहेत आणि 33 दशलक्ष अँड्रॉइड डिव्हाइसेसचा समावेश होता. याशिवाय, 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2025 च्या पहिल्या तिमाहीत डाउनलोड्समध्ये 148% वाढ झाली.

इंस्टाग्राम आणि टिकटॉक गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅप  डाउनलोडच्या यादीत आघाडीवर होते. 2024 मध्ये, इंस्टाग्रामने अनेकदा टिकटॉकला मागे टाकले, विशेषतः अमेरिकेतील तरुणांमध्ये. पाइपर सँडलरच्या सर्वेक्षणानुसार, 87% अमेरिकी किशोरवयीन मुले दरमहा इंस्टाग्राम वापरतात, तर टिकटॉक 79% आणि स्नॅपचॅट 72% वापरले जाते. आता चॅटजीपीटी या दोघांना टक्कर देत आहे. चॅटजीपीटीने भाषा समर्थन आणि आंतरराष्ट्रीय रोलआउट वाढवले, त्यानंतर विशेषतः भारतासारख्या बाजारपेठांमध्ये, जिथे डाउनलोड्समध्ये लक्षणीय वाढ झाली. भारत हा आता चॅटजीपीटीचा सर्वात वेगाने वाढणारा बाजार आहे. (हेही वाचा: What Is Action Figure Trend: Ghibli Image नंतर आता #actionfiguretrend चा ट्रेंड; ChatGPT AI Commands वापरून 'अशी' तयार करा तुमची अॅक्शन फिगर)

चॅटजीपीटीच्या ब्रँड ओळखीमुळे इतर एआय चॅटबॉट्सना आव्हानाचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, Anthropic च्या Claude ला चॅटजीपीटीच्या तुलनेत कमी यश मिळाले आहे. दुसरीकडे, xAI च्या Grok ला एलन मस्क यांच्या प्रभावामुळे आणि X प्लॅटफॉर्मवरील प्रचारामुळे फायदा होऊ शकतो. मात्र, चॅटजीपीटीची बाजारातील आघाडी अजूनही अढळ आहे, कारण त्याचे नाव एआयशी जोडले गेले आहे. चॅटजीपीटीचा वापर वाढल्याने डिजिटल कंटेंटशी वापरकर्त्यांचा संवाद बदलत आहे. लोक आता केवळ सामग्री पाहत नाहीत, तर ती स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.