
केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण राज्यात राबवत असताना शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा हा विषय सक्तीचा करण्यावरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. असे असतानाच आता राज्यात शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू (Dress Code School Teachers Maharashtra) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे लवकरच कमी केली जातील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या अध्यापणाच्या मूळ कामाकडे अधिक लक्ष देता येईल, असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी लवकरच शिक्षकांना गणवेश लागू केला जाईल. त्यासाठी आवश्यक म्हणून खारीचा वाटा म्हणून राज्य सरकार थोडाफार खर्चही उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभाग चर्चेत
राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा शिक्षण विभाग पाठिमागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी परीक्षा काळात होणारी पेपरफुटी, कधी उत्तरपत्रिका गहाळ होणे तर कधी उत्तर पत्रिकाच जळणे आदी बाबींमुळे हा विभाग चर्चेत आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, अवैधरित्या नोकरीस लागलेल्या शिक्षकांनाही सरकारी तिजोरीतून वेतन वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे शिक्षण विभाग चर्चेत असताना त्यावर निर्णय, कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शाळांमधील गुणवत्ता, शालेय साहित्य, गणवेश अशा एक ना अनेक मुद्द्यांवर शिक्षण विभाग सध्या पिछाडीवर दिसतो आहे, अशा वेळी या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी राज्य सरकार भलत्यात निर्णयांच्या पाठी लागल्याची टीका होऊ लागली आहे. (हेही वाचा, Jejuri Khandoba Mandir Dress Code: आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार)
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यापाठीमागे राज्य सरकारचे नेमके धोरण काय याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. याशिया शैक्षणिक वर्तुळातही त्याबाबत अद्याप विशेष भाष्य झाले नाही. शिक्षकांना गणवेश लागू करण्याबाबत कोणी खास मागणी केल्याचे अद्याप तरी पुढे आले नाही. याशिवाय शिक्षकांना अशा प्रकारची गणवेश सक्ती करुन राज्य सरकार नेमके कायसाधू इच्छिते याबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता आली नाही. त्यामुळे राज्य सरकारचा नेमका विचार तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ( Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी)
दरम्यान, शिक्षण विभागाने नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल केव्हा लागणार याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी वाढत आहे. या आधी दादा भुसे यांनी दोन्ही परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी आणि बारावी परिक्षेचा निकाल 15 मे पर्यंत लावण्यात येईल, तसा आमचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.