
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरासोबतच मुंबादेवी मंदिरात भाविकांना दर्शनाला येताना ड्रेस कोडचं भान ठेवण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्येही (Jejuri Khandoba Mandir) भाविकांसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यामध्ये भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असणार आहे.श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निर्णयामध्ये पाश्चिमात्य कपडे घालून आलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जेजुरीला येताना फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
जेजुरी खंडोबा मंदिरात लागू नवा ड्रेस कोड काय?
जेजुरी खंडोबा मंदिरात लागू नवा ड्रेस कोड स्त्री आणि पुरूष दोन्ही भाविकांसाठी लागू असणार आहे. यामध्ये फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट घालून येणार्यांना रोखलं जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे म्हणजेच आखूड-कमी कपडे घालून येणं ट्रस्टला अपेक्षित नाही. भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करावी असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. आज 10 मार्च पासूनच हा ड्रेस कोड लागू केला जात आहे. Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी .
पुणे जिल्ह्यात असलेल्या खंडोबाच्या गडावर वर्षाचे बाराही महिने भाविकांची दर्शनासाठी रांग असते. लग्न झाल्यानंतर अनेक नवदांम्पत्य हमखास देवाच्या दर्शनाला येतात. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठीचा मोठा उत्सव असतो. यादिवशी जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करण्याची रीत आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये 528 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आमचा उद्देश असून यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.