'जागतिक असमानता अहवाल 2022' (World Inequality Report 2022) नुसार, भारत हा जगातील सर्वात असमान देशांपैकी एक आहे, जिथे एकीकडे गरीब अजूनच गरीब होत आहे, तर दुसरीकडे समृद्ध उच्चभ्रू वर्ग वाढत आहे. अहवालानुसार, भारतातील शीर्ष 10 टक्के श्रीमंत लोकांचे उत्पन्न भारताच्या एकूण उत्पन्नाच्या 57 टक्के आहे, तर शीर्ष 1 टक्के श्रीमंत लोकांचे उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 22 टक्के इतके आहे. याउलट, देशाच्या एकूण उत्पन्नातील सर्वात खालच्या तळातील 50 टक्के लोकांचे योगदान केवळ 13 टक्क्यांवर आले आहे.
हा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे जे 'वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब' चे सह-संचालक आहेत. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. अहवालातील आकडेवारी सादर करताना देशातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वार्षिक 2 लाख 4 हजार 200 रुपये असल्याचे सांगण्यात आले. यापैकी, तळातील 50 टक्के लोक 53,610 रुपये कमावतात, तर शीर्ष 10 टक्के प्रौढ सरासरी 11,66,520 रुपये कमावतात. हा आकडा तळातील 50 टक्के प्रौढांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जवळपास 20 पट जास्त आहे.
यात म्हटले आहे की, भारत हा उच्चभ्रू वर्गातील लोकांनी भरलेला गरीब आणि अत्यंत असमान देश आहे. भारतात लैंगिक असमानता खूप जास्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला कामगारांच्या उत्पन्नाचा वाटा 18 टक्के आहे. हा आशियातील सरासरीपेक्षा कमी आहे (चीन वगळता 21 टक्के). (हेही वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय)
अहवालानुसार, देशातील 50% लोकसंख्येच्या नावावर मालमत्ता नाही. त्यांची सरासरी मालमत्ता 66,280 रुपये आहे, जी एकूण मालमत्तेच्या 6% आहे. त्याच वेळी, भारतातील मध्यमवर्ग असाच गरीब आहे, ज्याची सरासरी संपत्ती केवळ 7,23,930 रुपये आहे. ज्याचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा 29.5 टक्के वाटा आहे. या तुलनेत देशातील टॉप 10 टक्के लोक असे आहेत ज्यांच्याकडे भारतातील 65 टक्के संपत्ती म्हणजेच सुमारे 63,54,070 रुपये आहे. त्याच वेळी, 1 टक्के हा असा वर्ग आहे ज्याकडे सरासरी उत्पन्नाच्या 33 टक्के म्हणजेच सुमारे 3,24,49,360 रुपयांची मालमत्ता आहे.