फरारी हिरे व्यापारी आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याने विविध बँकांचे 7,848 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. देशात कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाब नॅशनल बँकेतील (PNB) घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच तो 2018 मध्ये पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. चोक्सी तेव्हापासून अँटिग्वामध्ये राहत आहे, जिथे त्याच्याकडे त्या देशाचे नागरिकत्व आहे. आकडेवारीनुसार, देशातील शीर्ष 50 विलफुल डिफॉल्टर्सकडे (Wilful Defaulters) 31 मार्च 2022 पर्यंत भारतीय बँकांचे एकत्रितपणे 92,570 कोटी रुपये कर्ज होते.
वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मेहुल चोक्सी याच्या पाठोपाठ एरा इन्फ्रा इंजिनिअरिंग (5,879 कोटी), रे ऍग्रो (4,803 कोटी), कॉन्कास्ट स्टील अँड पॉवर (4,596 कोटी), एबीजी शिपयार्ड (3,708 कोटी), फ्रॉस्ट इंटरनॅशनल (3,311 कोटी), विन्सम डायमंड्स अँड ज्वेलरी (2,931 कोटी), रोटोमॅक ग्लोबल (2,893 कोटी), कोस्टल प्रोजेक्ट्स (2,311 कोटी) आणि झूम डेव्हलपर्स (2,147 कोटी) अशा इतर मोठ्या थकबाकीदारांचा क्रमांक लागतो.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) 8.9 लाख कोटी रुपयांवरून तीन लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आरबीआयच्या मालमत्तेच्या गुणवत्तेच्या पुनरावलोकनानंतर एकूण एनपीमध्ये 5.41 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
विलफुल डिफॉल्टर ही कर्जदारांसाठी वापरली जाणारी आर्थिक संज्ञा आहे, ज्यांनी घेतलेले कर्ज परत फेडणे बाकी आहे, परंतु ते परत केले जात नाही. या कर्जदारांना बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कोणत्याही सुविधा नाकारण्यात आल्या आहेत. मंत्र्यांनी असेही सांगितले की बँकांनी 10.1 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 2 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीसह अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक (PNB) 67,214 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, ICICI बँकेने सर्वाधिक 50,514 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, तर HDFC ने 34,782 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. राईट ऑफ कर्जाचे कर्जदार हे ते कर्ज परतफेडीसाठी जबाबदार असल्याने आणि त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, राईट ऑफचा कर्जदारांना कोणताही फायदा होणार नाही. (हेही वाचा: एटीएम मधून पैसे काढताना ट्रान्झॅक्शन फेल झालं तरीही अकाऊंट मधून पैसे गेले तर काय करावं? पहा यावर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला RBI चा नियम)
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने शुक्रवारीच फरारी व्यापारी मेहुल चोक्सीच्या विरोधात कठोर कारवाई केली. एजन्सीने फसवणूक आणि विश्वासार्हतेचे गुन्हेगारी उल्लंघन केल्याबद्दल आणखी तीन एफआयआर नोंदवले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या उपमहाव्यवस्थापकांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोक्सी आणि इतर आरोपींवर विविध बँक संघटनांची 6747.97 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.