Draupadi Murmu (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) भाजपने (BJP) आज आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वतीने संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर एनडीएने द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. मुर्मू या पूर्वी झारखंडच्या राज्यपाल होत्या. या पहिल्या आदिवासी महिला आहेत ज्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी 20 नावांवर चर्चा केली, यामध्ये पूर्व भारतातून एखाद्या आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सांगितले.

जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू-

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू यांनी आपली राजकीय कारकीर्द एक नगरसेवक म्हणून सुरू केली होती. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या. पुढे त्या 2013 मध्ये, पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदापर्यंत पोहोचल्या.

ओडिशातील भाजपच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या, द्रौपदी मुर्मू नवीन पटनायक मंत्रिमंडळात मंत्री होत्या. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने बिजू जनता दल किंवा बीजेडी सत्तेत होते. त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक या स्वतंत्र प्रभारासह आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.

एकूण 6 वर्षे, एक महिना आणि 18 दिवस झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ निर्विवाद राहिला नाही. राज्याचे प्रथम नागरिक आणि विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्यांची खेळी संस्मरणीय ठरली. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्या झारखंडमधील राजभवन येथून 12 जुलै 2021 रोजी ओरिसातील रायरंगपूर येथील त्यांच्या गावी रवाना झाल्या आणि सध्या त्या तिथेच राहत आहेत. (हेही वाचा: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने दिली Draupadi Murmu यांना उमेदवारी)

राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव हे देशातील आदिवासी समाजाला आकर्षित करून घेण्याच्या भाजपच्या रणनीतीचा एक भाग असू शकतो. याद्वारे गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन आदिवासी समाजामध्ये एक सकारात्मक संदेश दिला जाऊ शकतो.