कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी मंगळवारी सांगितले की, 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान देशातील विविध राज्यांमध्ये सुमारे 38 लाख विवाह होणार आहेत. या 38 लाख विवाहांवर 4.74 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. दिवाळी सणाच्या काळात रेकॉर्डब्रेक व्यवसाय केल्यानंतर, देशातील व्यापारी समुदाय 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. लग्नसराईच्या हंगामामुळे मुख्य किरकोळ व्यापारात वस्तू आणि सेवांचा मोठा व्यवसाय होईल.
गेल्या वर्षी याच कालावधीबद्दल बोलायचे झाले तर देशात सुमारे 32 लाख विवाह झाले होते. या लग्नामुळे 3.75 लाख कोटी रुपयांचा व्यवसायाचा अंदाज व्यक्त केला होता. प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवउठनी एकादशी म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. विशेषत: हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या समाजात विवाहाची तिथी डिसेंबरपर्यंत असणार आहे.
नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या तारखा 23,24,27,28 आणि 29 आहेत. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात लग्नाच्या तारखा 3,4,7,8,9 आणि 15 आहेत. हे दिवस लग्नासाठी शुभ मानले जातात. दुसऱ्या टप्प्यात जानेवारीच्या मध्यापासून लग्नाच्या तिथी सुरु होतील. हा हंगाम जुलै 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या विवाहाच्या हंगामात देशभरात सुमारे 38 लाख विवाहसोहळे पार पडण्याची शक्यता आहे (यामध्ये डोंगराळ आणि दुर्गम भागांच्या आकडेवारीचा समावेश नाही). या हंगामात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 4 लाखांहून अधिक विवाह होण्याची अपेक्षा आहे व सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. CAIT ने काढलेल्या अंदाजाच्या आधारे खंडेलवाल म्हणाले, या हंगामात 3 लाख रुपये खर्चून सुमारे 7 लाख विवाह होतील. असे सुमारे 8 लाख विवाह होतील, ज्यासाठी प्रत्येकी 6 लाख रुपये खर्च येईल. 10 लाख रुपये खर्च करून 10 लाख विवाह होणार आहेत. 15 लाख खर्चाचे 7 लाख विवाह होणार आहेत. पाच लाख असे विवाह होणार असून ज्यावर 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. साधारण 50 हजार लग्नांवर प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय 50 हजार विवाहांवर प्रत्येकी 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च अपेक्षित आहे. (हेही वाचा: GST Notice to Zomato and Swiggy: झोमॅटो, स्विगी यांना डिलिव्हरी चार्जेसबाबत प्रत्येकी 500 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस: Reports)
खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, या हंगामात लग्न समारंभांमध्ये होणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के खर्च वस्तूंच्या खरेदीवर केला जाईल. उर्वरित 50 टक्के रक्कम सेवा खरेदीवर खर्च केली जाईल. यामध्ये कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू मुख्य घटक आहेत. यासह सुका मेवा, फळे, मिठाई, अन्नधान्य, किराणा आणि भाजीपाला, भेटवस्तू आणि इतर विविध वस्तूंचा समावेश आहे. यासह सेवा क्षेत्राचा विचार केला तर ढोबळ अंदाजानुसार बँक्वेट हॉल, हॉटेल्स आणि इतर लग्न स्थळे, इव्हेंट मॅनेजमेंट, सजावट, खानपान, फुलांची सजावट, प्रवास आणि कॅब सेवा, फोटो आणि व्हिडिओ शूट, ऑर्केस्ट्रा-बँड, लाईट आणि साउंडवरही मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे.