V. K. Sasikala | (File Image)

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्याच्या मुख्यमंत्री जे. जयललीता (J. Jayalalithaa) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोठ्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर एआयडीएमके (AIADMK) पक्षातून निलंबित झालेल्या नेत्या व्ही. के. शशिकला (V. K. Sasikala) तब्बल चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. एका भ्रष्टाचार प्रकरणात (Corruption Case) त्यांना शिक्षा झाली होती. शशिकला यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णलयातूनच त्यांच्या सूटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शशिकला यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची एक आठवड्यापूर्वी स्पष्ट झाले होते.

तामिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या शशिकला यांच्यावर 66 कोटी रुपयांची संपत्ती बेहिशोबी बाळगल्याप्रकरणी खटला सुरु होता. या खटल्यात फेब्रुवारी 2017 मध्ये शिक्षा झाल्यापासून त्या अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात बंद होत्या. शशिकला यांची सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. जमलेले समर्थक शशिकला यांच्या बाजूने घोषणाबाजी करत होते. काही समर्थकांनी या वेळी मिठाईसुद्धा वाटली. (हेही वाचा, Tamil Nadu: जयललिता यांचे घर Veda Nilayam मधील वस्तू सरकारच्या ताब्यात; सापडले 4 किलो सोने, 601 किलो चांदी, 10 हजार कपडे अशा 32,721 गोष्टी (See List) )

शशिकला यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शशिकला यांच्यातील कोरोना संक्रमनाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या नातेवाईक जी इलावरासी यांनाही कोरोनाव्हायरस संसर्ग झाला आहे. त्यांनाही व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इलावरासी हेसुद्धा भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. आता इलावरासी यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या बंगळुरु मेडिकल कॉलेजच्या निदेशक डॉक्टर सी आर जयंती यांनी एक बुलेटीन प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की 66 वर्षीय शशिकला यांच्यात दिसणारी कोरोनाची लक्षणे आता कमी झाली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जयंती यांनी म्हटले आहे की, शशिकला यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेऊन आहे.