Man Living as Woman

एकीकडे भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवीन उंची गाठत आहेत, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूरमधून (Jaunpur) याच्या अगदी उलट धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.  जौनपूर येथील एका गावातील चिंता हरण चौहान नावाचा माणूस गेल्या 36 वर्षांपासून महिलांच्या वेशात राहत आहे. यामागे ‘भूत’ हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. मृत पत्नीच्या भूताच्या भीतीमुळे तो दररोज कपाळावर कुंकू, हातात बांगड्या, कानात झुमके, नखांवर नेलपॉलिश लावून तयार होतो. हे प्रकरण केवळ धक्कादायकच नाही तर समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा किती खोलवर रुजल्या आहेत हेदेखील दर्शवते.

चिंता हरण चौहानचा दावा आहे की, त्याची दुसरी पत्नी बंगाली होती. तिने आत्महत्या केली व मृत्यूनंतर तिचा आत्मा त्याला छळू लागला. तो आत्मा त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने त्याला इशारा दिला की, जर त्याने सोळा शृंगार करून स्त्री सारखे जीवन स्वाकारले नाही, तर तो आपला जीव गमावेल. त्यानंतर भीतीपोटी चिंता हरणने साडी नेसायला सुरुवात केली आणि स्वतःचे पूर्णपणे स्त्रीमध्ये रूपांतर केले. लोकल 18 शी बोलताना तो म्हणाला, 'जेव्हा जेव्हा मी हा वेश काढतो तेव्हा मला अस्वस्थ वाटू लागते. मी आजारी पडतो. आता मला हा वेशच घालून राहणे योग्य वाटते.’

चिंता हरणचे आयुष्य या पेक्षाही विदारक आहे. त्याच्या कुटुंबातील शोकांतिका अतिशय दुःखद आहेत. दुसऱ्या पत्नीच्या मृत्युनंतर त्याने तिसरे लग्न केले, मात्र तिसऱ्या लग्नानंतर त्याच्या घरात मृत्यूची मालिका सुरु झाली. त्याच्या 9 मुलांपैकी 7 मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे त्याच्यावर आणखी मानसिक ताण आला आहे. त्याला असे वाटते की हे सर्व मृत्यू त्याच्या मृत पत्नीच्या आत्म्याचा परिणाम आहे. (हेही वाचा: Pregnant Woman Sexually Assaulted: तामिळनाडूमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी पीडितेला ट्रेनमधून फेकलं

या घटनेमुळे गावात आणि परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या मानत आहेत व या व्यक्तीला योग्य सल्ला आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे नमूद करतात, तर अनेकजण म्हणत आहेत की, खरेच हा भूतांचा प्रभाव आहे. चिंतारन खरोखरच भूतांच्या भीतीने स्त्री बनला का की तो एखाद्या मानसिक स्थितीचा परिणाम आहे? हा प्रश्न अजूनही कायम आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, समाजामध्ये अशा बाबींबाबत संवेदनशीलता आणि जागरूकता वाढणे आवश्यक आहे.