UP Shocker: बागपतमध्ये 30 रुपयांसाठी 11वीच्या विद्यार्थ्याची हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत येथून एका हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अवघ्या 30 रुपयांसाठी अकरावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. बागपत जिल्ह्यातील बरौत पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून हे प्रकरण समोर आले आहे. केवळ 30 रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून या विद्यार्थ्याची कथितपणे गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृताच्या वडिलांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बागपतच्या एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी या घटनेची माहिती दिली.

बरौत पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (SHO) देवेश कुमार सिंह यांनी सांगितले की, केएचआर इंटर कॉलेजचा विद्यार्थी हृतिक (17) याची शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास हत्या करण्यात आली. एसएचओच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याच्या हत्येच्या प्राथमिक तपासात 30 रुपयांवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हृतिकचा त्याच गावातील तीन तरुणांशी 30 रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला. (हेही वाचा: UP Shocker: अयोध्येत इयत्ता पाचवीमधील मुलीला विवस्त्र करून तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना केला स्पर्श; आरोपी मुख्याध्यापकाला अटक)

हा वाद इतका वाढला की आरोपींनी हृतिकचा गळा दाबून खून केला. एसएचओ म्हणाले की, मृताच्या कुटुंबीयांनी विकास, राजीव आणि इतर तिघांविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. सिंह यांच्या म्हणण्यानुसार हत्या कशी झाली हे पोस्टमार्टम रिपोर्टवरूनच कळू शकेल. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.