Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी महत्त्वाची बैठक
PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील भाजप (BJP) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा मंत्रिमंडळविस्तार आणि काही मंत्र्यांचा खातेबदल लवकरच होण्याची शक्यता आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक आज (6 जुलै) पार पडत आहे. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), बीजेपी अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आधीही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत 20 जून रोजी चर्चा केली आहे.

चर्चा आहे की, काही मंत्र्यांना हटवून त्या ठिकाणी नवे चेहरे आणले जाण्याची शक्यता आहे. यात आगामी काळात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळासमोर ठेऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान मोदी मंत्रीमंडळात 9 मंत्री असे आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक विभाग आहेत. यात प्रकाश जावडेकर, डॉक्टर हर्षवर्धन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, नितिन गडकरी, रविशंकर प्रसाद, स्मृति ईरानी आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Rafale Deal: मोदी सरकार JPC चौकशीला का तयार नाही? राफेल विमान व्यवहारांवरुन राहुल गांधी यांचा सवाल)

प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, उवजड उद्योग आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी आहे. पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि खाद्य आपूर्ती मंत्रालय आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे स्टील आणि पेट्रोलियम मंत्रालय आहे. नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक आणि एमएसएमई मंत्रालय आहे. नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे कृषि, ग्रामीण विकास पंचायती राज आणि फूड प्रोसेसिंग मंत्रालय, रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आहे. स्मृती ईरानी यांच्याकडे महिला आणि बालकल्याण आणि टेक्सटाईल मंत्रालय आहे. हरदीप सिंह पुरी (राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार) यांच्याकडे हाउसिंग आणि नागरिक उड्डयन मंत्रालय आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने संधी मिळणाऱ्या चेहऱ्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि सर्वानंद सोनोवाल या दोन प्रमख नावांची चर्चा आहे. उत्तर प्रदेश राज्यात पुढच्याच वर्षी विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे या राज्यातील 5 नेत्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यात वरुण गांधी, रीता बहुगुणा जोशी, अनिल जैन, रामशंकर कथेरिया आणि जफर इस्लाम यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्येही निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे नैनितालचे खासदार अजय भट्ट किंवा राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळू शकते.याशिवाय दिल्लीहून भाजप खासदार परवेश वर्मा आणि मीनाक्षी लेखी, महाराष्ट्रातीन नारायण राणे यांचेही नाव चर्चेत आहे.