Nirmala Sitharaman | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Union Budget 2025 Date, Time: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Union Budget 2025-26) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात आयकर सवलतीसह अनेक नवीन घोषणा केल्या जाऊ शकतात. मोदी 3.0 चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल. मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प गेल्या वर्षी 23 जुलै रोजी सादर करण्यात आला होता. यावेळी निर्मला सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल, ज्यामध्ये 6 वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वित्त मंत्रालयात एक विशेष परंपरा पार पाडली जाते, ज्याला 'हलवा समारंभ' म्हणतात. यंदाही ही परंपरा पाळली जाणार आहे. हलवा समारंभ हा भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दिवसापासून बजेट दस्तऐवजांच्या छपाईला सुरुवात केली जाते. आज, शुक्रवारी (24 जानेवारी) हलवा समारंभ होणार आहे.

यावेळी नॉर्थ ब्लॉकमध्ये शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सलवा रामारंभ होईल. त्यानंतर बजेटचा मसुदा तयार करणारे सर्व अधिकारी 'लॉक-इन' कालावधीत जातात. या कालावधीत त्यांना नॉर्थ ब्लॉक परिसरातच राहावे लागते.

परंपरेनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी शनिवार 1 फेब्रुवारी आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये स्थापित केली होती. यापूर्वी, अर्थसंकल्प सामान्यतः फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात होता. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने स्पष्ट केले की, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नवीन धोरणे लागू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

अर्थसंकल्प थेट प्रक्षेपण-

या बजेटचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूज आणि संसद टीव्हीवर केले जाईल. याशिवाय, तुम्ही संसद टीव्ही आणि डीडी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर देखील ते थेट पाहू शकता. यासह देशातील जवळजवळ सर्व वृत्तवाहिन्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करतील. (हेही वाचा: Section 80C म्हणजे काय? ज्यामध्ये मिळणार 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट, काय आहे कव्हर, जाणून घ्या, सविस्तर माहिती)

नोकरदारांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. यावेळी अर्थसंकल्पात आयकर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. हे 10 लाख रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. तसे झाल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतो आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार होत नाही. मात्र, यावेळी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शेअर बाजारही खुला राहणार आहे. अर्थसंकल्पीय घोषणांवरील तात्काळ बाजाराच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी शेअर बाजार खुले असतात.