Unemployment In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात वाढली बेरोजगारी; तब्बल 1 कोटी लोकांनी गमावला रोजगार
Unemployment | Representational Image (Photo Credits: pixabay)

गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. आता ही कोरोनाची दुसरी लाटही बरीच भयावह असल्याचे सिद्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुसर्‍या लाटेमुळे लाखो लोकांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे आणि यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. दुसरीकडे माहिती मिळत आहे की, या दुसर्‍या लाटेमुळे देशातील जवळपास 1 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सोमवारी ही माहिती दिली. व्यास यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, थिंक टँकच्या अंदाजानुसार मे महिन्यात बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण मेमध्ये 12 टक्के असल्याचा अंदाज आहे, जे एप्रिलमध्ये 8 टक्के होते.

व्यास म्हणाले, ‘अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाल्यावर बेरोजगारीची समस्या काही अंशी कमी होण्याची अपेक्षा आहे. पण ती पूर्णपणे संपणार नाही.’ व्यास यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत त्यांना नवीन रोजगार शोधणे अवघड होत आहे. असंघटित क्षेत्रात वेगाने रोजगार निर्मिती केली जात आहे, परंतु संघटित क्षेत्रात चांगल्या नोकर्‍या येण्यास वेळ लागत आहे. बेरोजगारीचा दर एप्रिलच्या 8 टक्क्यावरून मेच्या 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा दुसरा अर्थ आहे की, महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे जवळपास 1 कोटी भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

महेश व्यास म्हणाले की, त्यांच्या संस्थेने एप्रिल महिन्यात देशव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 1.75 लाख घरांचा समावेश होता. या सर्वेक्षणात मागील वर्षभरात उत्पन्न वाढीशी संबंधित असलेला कल पाहिला गेला. यावेळी केवळ 3 टक्के कुटुंबांचे म्हणणे होते की त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, तर 55 टक्के लोक म्हणाले की मागील वर्षात त्यांचे उत्पन्न घटले आहे. अशाप्रकारे गेल्या वर्षी कोरोनाची लाट सुरु झाल्यापासून 97 टक्के कुटुंबांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. (हेही वाचा: भारतात पहिल्यांदाच आढळला कोरोना स्ट्रेन, WHO कडून ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ असे नामकरण)

दरम्यान, गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे मे महिन्यात बेरोजगारीचा दर विक्रमी 23.5% पर्यंत पोहोचला होता. तज्ञांच्या मते, दुसर्‍या वेव्हचा पीक टाइम निघून गेला आहे व राज्ये आता हळूहळू आर्थिक बाबींवरील निर्बंध हटवतील.