जगातील सर्वात उंच शिवमंदिर असलेले तुंगनाथ धाम (Tungnath Temple) हे एका बाजूला कलले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की, गढवाल हिमालयातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात 12,800 फूट उंचीवर असलेले तुंगनाथ मंदिर पाच ते सहा अंशांनी झुकले आहे. याशिवाय, परिसरातील लहान संरचना 10 अंशांपर्यंत झुकलेल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले, की त्यांनी केंद्र सरकारला या निष्कर्षांची माहिती दिली आहे आणि हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून समाविष्ट करण्याची सूचना केली आहे.
TOI नुसार, एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, सरकारने या मंदिराला राष्ट्रीय महत्त्व असलेले स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्याअंतर्गत लोकांकडून हरकती मागवणारी अधिसूचना जारी केली आहे. एएसआय मंदिराच्या नुकसानीचे मूळ कारण शोधून काढेल जेणेकरुन त्याची त्वरित दुरुस्ती करता येईल.
एएसआयच्या डेहराडून सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ मनोज कुमार सक्सेना म्हणाले, 'सर्वप्रथम आम्ही नुकसानीचे मूळ कारण शोधू व त्याची तातडीने दुरुस्ती करता आली तर आम्ही करू. याशिवाय मंदिराची सखोल पाहणी करून कामाचा सविस्तर कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.’ गरज भासल्यास तज्ज्ञांशी सल्लामसलत करून मंदिराचा खराब झालेला भाग बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तुंगनाथ हे जगातील सर्वोच्च शिव मंदिर मानले जाते, जे कात्युरी शासकांनी 8 व्या शतकात बांधले होते. हे बद्री-केदार मंदिर समिती (BKTC) च्या प्रशासनाखाली आहे. मंदिराच्या परिस्थितीबाबत बीकेटीसीला पत्रही पाठवण्यात आले असल्याचे मनोज कुमार सक्सेना यांनी सांगितले. बीकेटीसीचे चेअरमन अजेंद्र अजय म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा झाली जिथे सर्व भागधारकांनी एएसआयचा प्रस्ताव नाकारला. मंदिराचे मूळ स्वरूप पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही त्यांची मदत घेण्यास तयार आहोत, परंतु आम्ही ते त्यांच्या हाती न स्वतः करू. आमच्या निर्णयाबाबत त्यांना लवकरच कळवले जाईल.’ (हेही वाचा: Chardham Yatra 2023: केदारनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 24 यात्रेकरूंचा मृत्यू)
दरम्यान, तुंगनाथ हे पाच केदारांपैकी तिसरे मानले जाते. येथे भगवान शंकराच्या भुजांची पूजा केली जाते. तुंगनाथ धाम हे धार्मिक स्थळ आहे तसेच अतिशय सुंदर पर्यटन स्थळही आहे. येथे वर्षभर भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते. हे मंदिर पांडवांनी शिवाला प्रसन्न करण्यासाठी बांधण्यात आल्याचीही मान्यता आहे.